‘सायरस मिस्त्रींची कार 100 किमी प्रति तास वेगाने धावत होती, तेव्हाच … ‘, मर्सिडीजच्या अहवालात खुलासा | पुढारी

'सायरस मिस्त्रींची कार 100 किमी प्रति तास वेगाने धावत होती, तेव्हाच ... ', मर्सिडीजच्या अहवालात खुलासा

पुढारी ऑनलाईन: पालघरमध्ये झालेल्या अपघातात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने पोलिसांकडे प्राथमिक अहवाल सादर केला आहे. मर्सिडीजने सांगितले की, अपघातापूर्वी मिस्त्री यांची कार 100 किमी प्रति तास वेगाने जात होती. डॉ.अनायता पंडोल यांनी डिव्हायडरला धडकण्यापूर्वी ५ सेकंद अगोदर ब्रेक लावला.

ब्रेक लावल्यानंतर कारचा वेग 89 किमी होता. यादरम्यान कार डिव्हायडरला धडकली. हाँगकाँगमधील मर्सिडीज बेंझ तज्ञांची टीम भारतात येत आहे. 12 सप्टेंबर रोजी ही टीम अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी कारची तपासणी करू शकते. कंपनीने कारमधील चिप विश्लेषणासाठी जर्मनीला पाठवली आहे. त्याचवेळी आरटीओनेही आपला अहवाल पालघर पोलिसांना दिला आहे.

कारच्या 4 एअर बॅग उघडल्या

एसपी बाळासाहेब पाटील म्हणाले की, अपघाताच्या वेळी कारच्या चार एअरबॅग उघड्या होत्या. यामध्ये चालक डॉ.अनायता यांना तीन एअर बॅगचे संरक्षण मिळाले. समोरच्या दुसऱ्या सीटवर बसलेल्या दारियसच्या समोरची एअर बॅगही उघडली. डॉक्टर आणि तिचा पती दरीयस पांडोल रुग्णालयात दाखल आहेत. टाटा समूहाचे माजी प्रमुख मिस्त्री आणि कारच्या मागील सीटवर बसलेले जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला.

मर्सिडीज बेंझचे वक्तव्य

मर्सिडीज बेंझने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करतो. त्यामुळे आम्ही आमचे निष्कर्ष फक्त अधिकार्‍यांशी शेअर करू.’ कंपनीने पुढे म्हटले आहे की, ‘आम्ही त्यांच्याशी शक्य तितके सहकार्य करत आहोत आणि आवश्यकतेनुसार पुढील माहिती आणि स्पष्टीकरण थेट अधिकाऱ्यांना पाठवले जाईल.’

Back to top button