नितीन गडकरींचा बंगळुरूसाठी स्कायबस सेवेचा प्रस्ताव; वाहतूक कोंडीपासून मुक्ती | पुढारी

नितीन गडकरींचा बंगळुरूसाठी स्कायबस सेवेचा प्रस्ताव; वाहतूक कोंडीपासून मुक्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बंगळूरमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्कायबस सेवाला मंजुरी दिली आहे. स्कायबसही मेट्रो सारखीच असणार आहे. परंतु फरक एवढाच आहे कि, ती रस्त्यांच्या वरच्या उंच ट्रॅकवर धावते आणि बसण्याची जागा खाली आहे.

स्कायबस हा एक चांगला पर्याय असू शकतो
मंत्री गडकरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बंगळुरूमधील स्कायबस हा एक चांगला पर्याय असल्याचे सुचविले आहे. यात सुमारे 200 लोक बसू शकतात. रस्त्यावर आणि हवेत कुठेही सहज जाऊ शकतात. ते म्हणाले की आम्ही वाराणसीमध्येही स्कायबस सेवेची योजना आखत आहोत. जगात फक्त दोनच कंपन्या आहेत ज्या स्कायबस बनवण्यात माहिर आहेत. यापैकी एक कंपनी फ्रान्समध्ये, आणि दुसरी ऑस्ट्रियामध्ये आहे.

अहवालानंतर चर्चा सुरू होईल
नितीन गडकरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सल्लागाराला तीन महिन्यांत प्राथमिक अहवाल तयार करण्यास सांगणार असून जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रस्तावावर अधिक चर्चा केली जाईल. परिवहन विकास परिषदेच्या 41 व्या बैठकीत शुक्रवारी गडकरी बोलत होते. बंगळूरमधील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी ट्रॉली बसचा दुसरा पर्याय म्हणून त्यांनी उल्लेख केला. यात 88 प्रवासी बसू शकतात.

बहुस्तरीय उड्डाणपूलही प्रस्तावित आहे
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरातील बहुस्तरीय उड्डाणपूलही गडकरींनी प्रस्तावात मांडला. ते म्हणाले की बंगळुरू-म्हैसुरू, बंगळुरू-चेन्नई, बंगळुरू-विजयवाडा, बंगळुरू-पुणे आणि सॅटेलाइट टाऊन रिंगरोड द्रुतगती मार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. शहरातील सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे आम्ही वरच्या डेकवर मेट्रो रेल्वेसह मल्टी लेयर एलिव्हेटेड फ्लायओव्हरची योजना करत आहोत.

Back to top button