पिंपरी : बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण करून खून; वीस कोटींची मागितली होती खंडणी | पुढारी

पिंपरी : बांधकाम व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण करून खून; वीस कोटींची मागितली होती खंडणी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना ९ सप्टेंबरला रात्री उशिरा उघडकीस आली. आदित्य गजानन ओगले (वय ७) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी त्याचे वडील गजानन श्रीकांत ओगले (४९, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी ८ सप्टेंबरला पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपी मंथन किरण भोसले (रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) आणि अनिकेत श्रीकृष्ण समुद्रे (रा. घरकुल, निगडी) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य गुरुवारी सायंकाळी खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो दिसून न आल्याने त्याच्या आई वडिलांनी शोध सुरू केला. दरम्यान, आदित्यच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, तांत्रिक तपास करून गुंडा विरोधी पथकाने आदित्यच्या सोसायटीत राहणाऱ्या आरोपी मंथन याच्याकडे कसून चौकशी केली. सुरुवातीला मंथन याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र, तपास पथकातील हरीश माने यांनी मोठ्या शिताफीने मंथन याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मंथन याने साथीदार अनिकेत याच्या मदतीने आदित्यचा गळा दाबून खून केला व मृतदेह भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीच्या पडक्या इमारतीच्या टेरेसवर फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

वीस कोटी रुपयांची मागणी
मयत आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी त्यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे आरोपींनी केवळ पैशासाठी आदित्यचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, पोलिसांना यामध्ये वेगळाच संशय येत आहे. आरोपी आणि ओगले कुटुंबीय एकाच सोसायटीत राहत होते. त्यामुळे त्यांच्यात काही वाद होते का, याचा तपास सध्या पोलिस करीत आहेत.

Back to top button