हिंजवडी: दोन वर्षांनी आयटीत गणेशोत्सव उत्साहात संपन्न, विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजर | पुढारी

हिंजवडी: दोन वर्षांनी आयटीत गणेशोत्सव उत्साहात संपन्न, विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजर

हिंजवडी: आयटी नगरी हिंजवडी आणि परिसरात दहाव्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणरायाला निरोप दिला. तब्बल दोन वर्षांनी आयटी नगरीत ढोल-ताशाचा गजर झाला. यामुळे तरुणाईमध्ये उत्साह होता. यावर्षी गणेश मंडळांनी देखाव्यांवर फारसा भर दिला नव्हता. मात्र मिरवणुकीत या मंडळांनी उत्साहाने सहभाग घेतला. आयटीतील मंडळांच्या शिस्तबद्ध मिरवणूक असल्याने ही परंपरा कायम राहिली. तर मिरवणुकीच्या सुरुवातीलाच वरुण राजाने हजेरी लावल्याने काहीसा खंड पडला.

सायंकाळी ७ च्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. सुरुवातीला जय भवानी मंडळाच्या गणपतीच्या मिरवणुकीने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या गणपतीने सर्वचे लक्ष वेधले. यामध्ये शिवाजी महाराज यांना विशेष मानवंदना देण्यात आली. शिवाजी महाराज यांच्या नावाने भारतीय नौदलाचे आभार मानण्यात आल्याने उपस्थित भाविकांनी यास मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर हनुमान तालीम मित्र मंडळ, पंचरत्न तरुण मंडळ या मंडळांनी लक्ष वेधले. यासह क्रांती मित्र मंडळ, संत तुकाराम मित्र मंडळ, मुकाई मित्र मंडळाच्या गणपतीने उपस्थित अनेक भाविकांचे लक्ष वेधले.

दोन वर्षात होत असलेल्या या उत्सवास आयटीयन्सनी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला. ढोल-ताशा आणि डीजेच्या तालावर कित्येक तास तरुणाई नाचत होती. गणेशोत्सव काळात अखेरच्या दिवसात राजकीय पदाधिकाऱ्यांनी मुळशीत विविध मंडळांना भेटी दिल्या.

Back to top button