सीपीआर मधील डॉक्टरांची २८ टक्के पदे रिक्त; उपचारावर होतोय परिणाम | पुढारी

सीपीआर मधील डॉक्टरांची २८ टक्के पदे रिक्त; उपचारावर होतोय परिणाम

कोल्हापूर ः एकनाथ नाईक

सीपीआर अर्थात छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांचे आधारवड आहे. या रुग्णालयाचा लौकिक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांनी वाढविला आहे. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे. सध्या याच रुग्णालयात रुग्णांवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर शोधावे लागत आहेत. येथे मंजूर असलेली 28 टक्के पदे रिक्त आहेत. याकडे लोकप्रतिनिधींसह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे.

कोरोना महामारीत सीपीआर मधील डॉक्टरांनी छातीची ढाल करून अखंड पावणे दोन वर्षे ही सेवा सुरू ठेवली आहे. येथे दर्जेदार वैद्यकीय साधने, डॉक्टरांवरील विश्वास यामुळे येथील बाह्यरुग्ण विभाग नेहमीच गजबजलेला असतो. डॉक्टरांची अनेक पदे येथे रिक्त असल्याने कामाचा अतिरिक्त भार येथील अन्य डॉक्टरांवर पडला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यापासून सीपीआरमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, कुचराई न करता येथील डॉक्टर रुग्णांना सेवा देत आहेत. येथील अनेक विभागांची विभागप्रमुख पदेच रिक्त आहेत. शिवाय रुग्णालयात महत्त्वाचे असणारे वैद्यकीय अधीक्षकपदच येथे रिक्त आहे.

त्वचारोगतज्ज्ञ, मनोविकारतज्ज्ञ, शल्यचिकित्सा शास्त्र ट्रामा, अस्थिव्यंगोपचार शास्त्र ट्रामा, बधिरीकरण शास्त्र ट्रामा ही प्राध्यापकांची तर शरीरक्रिया शास्त्र, जीवरसायन शास्त्र, शरीरविकृती शास्त्र, प्रादेशिक शरीर विकृतीशास्त्र, औषध वैद्यकशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र ट्रामा, अस्थिव्यंगोपचार शास्त्र ट्रामा, बधिरीकरण शास्त्र ट्रामा, क्ष-किरणशास्त्र अशी सहयोगी प्राध्यापकांची आणि शरीररचना शास्त्र, जीव रसायनशास्त्र, शरीरविकृती शास्त्र, प्रादेशिक शरीर विकृतीशास्त्र, औषधशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, बालरोग शास्त्र, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, मनोविकृती शास्त्र ही सहायक प्राध्यापकांची मंजूर असलेली पदे रिक्त आहेत. रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज आहे.

पदांची सद्यःस्थिती

प्राध्यापक                  सहयोगी प्राध्यापक                      सहायक प्राध्यापक 

मंजूर : 16                 मंजूर : 47                                    मंजूर : 76

रिक्त : 07                रिक्त : 11                                      रिक्त : 21

Back to top button