परदेशात स्थायिक होण्याची जी मानसिकता सध्या देशातील श्रीमंत वर्गात दिसत आहे, ती चिंताजनक आहे. या प्रक्रियेचे अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. म्हणूनच ही मानसिकता तयार होण्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करणे देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे.
आपला देश सोडून अन्य देशांत स्थायिक होणार्यांची संख्या एका अंदाजानुसार जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात अधिक आहे. आकडेवारीनुसार, सुमारे तीन कोटी भारतीय 189 देशांमध्ये राहतात. एवढेच नव्हे, तर जगभरातून पैसा कमावून आपल्या देशात पाठविणार्यांमध्येही सर्वाधिक संख्या भारतातीयांचीच आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वीपर्यंत परदेशातील भारतीय वर्षाकाठी सुमारे 73 अब्ज डॉलर भारतात पाठवीत होते.
आफ्रो-आशियाई बँकेने 2018 च्या ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यूमध्ये म्हटले आहे की, 2018 मध्ये चीनमधून 15 हजार, रशियातून 7 हजार, तुर्कीमधून 4 हजार आणि भारतातून 5 हजार श्रीमंत नागरिकांनी स्थलांतर केले आणि ते अन्य देशांत स्थायिक झाले. त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2017 मध्ये भारतातील 7 हजार श्रीमंतांनी देश सोडला होता. 2014 मध्ये देश सोडून जाणार्या श्रीमंतांची संख्या 6 हजार होती. 2019 मध्ये 7 हजार श्रीमंत भारतीयांनी देश सोडला. 2014 पासून 2019 पर्यंत सुमारे 35 हजार श्रीमंत भारतीयांनी देश सोडला, असा अंदाज आहे. 2020 मध्ये जेव्हा कोरोनामुळे संपूर्ण जगभरात प्रवास जवळजवळ बंद होता, त्या दरम्यानही अनेक श्रीमंतांनी देश सोडला. एवढेच नव्हे, तर मॉर्गन स्टॅनली या आंतरराष्ट्रीय फर्मकडे देश सोडून अन्यत्र स्थायिक होण्यासंबंधी विचारपूस करणार्यांची संख्याही भारतातच सर्वाधिक होती. जगातील कोणत्याही देशात स्थायिक होण्याबाबत सुविधा आणि सवलती याबाबत सल्ला देणारी ही फर्म आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 2020 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 63 टक्के जास्त श्रीमंत भारतीयांनी स्थलांतर केले.
आपला देश सोडून अन्यत्र स्थायिक होऊ पाहणार्यांचे प्रमाण अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. अर्थात, इच्छा असूनही अनेकजण तसे करू शकत नाहीत हा भाग वेगळा. भारत सोडून जाणार्या श्रीमंतांना अनेक देशांमध्ये स्थायिक व्हायला आवडते; परंतु सर्वाधिक भारतीयांना जेथे स्थायिक व्हायला आवडते ते देश म्हणजे सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया. अनेक पेशांशी संबंधित लोकांबरोबरच यात उद्योजक, व्यावसायिक, तसेच कलावंतांचा आणि खेळाडूंचाही समावेश असतो.
दरवर्षी वेगवेगळ्या देशांमधील सुमारे 50 हजार लोक अन्य देशांत जाऊन स्थायिक होतात. परंतु, यातील 95 टक्के संख्या विकसनशील देशांमधून विकसित देशांत स्थलांतर करणार्यांची असते, हेही खरे आहे. भारताव्यतिरिक्त रशिया आणि चीनमधील श्रीमंत लोक मोठ्या संख्येने देश सोडून जातात.
मोठ्या संख्येने भारतीयांनी परदेशांत स्थलांतर केल्याचे अनेक दुष्परिणाम होत असतात. एक म्हणजे, परदेशांत असलेली आपल्या देशाची प्रतिमा बिघडते. दुसरी गोष्ट अशी की, परदेशांत जाऊन स्थायिक होणार्या श्रीमंत लोकांमधील 99.99 टक्के लोक भारतातच कमाई करून श्रीमंत झालेले असतात आणि आपला सर्व पैसा घेऊन ते परदेशी जातात. या प्रक्रियेत देशाचे दोन प्रकारे नुकसान होते. एक म्हणजे, देशातील भांडवल परदेशात जाते आणि दुसरे नुकसान असे की, या मंडळींच्या व्यवसायाचा मोठा हिस्सा भारतातच राहतो. त्यामुळे ते राहतात दुसर्या देशांत; पण कमाई भारतातच सुरू ठेवतात.
येथे महत्त्वाचा प्रश्न असा की, अखेर भारतातील श्रीमंत लोकांमध्ये देश सोडून जाण्याची शर्यत का लागली आहे? याबाबत सामान्यतः एक मत असे मांडले जाते की, भारतात कर अधिक आहेत. त्यामुळे लोक भारत सोडून परदेशांत जात आहेत. परंतु, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडा या तीनही देशांत कर भारतापेक्षा जादा आहेत. अर्थात, केंद्र सरकारने काही वर्षांपासून देश सोडून परदेशी स्थायिक होण्यासाठी श्रीमंतांमध्ये लागलेल्या चढाओढीची कारणे जाणून घेण्याचे काम केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला दिले आहे आणि पाच वरिष्ठ तज्ज्ञांच्या एका समितीने या मानसिकतेचे विश्लेषण केले आहे. भारतात करांचे दर अधिक असल्याचे एक कारण यात दिले असले, तरी ते खरे वाटत नाही. सायप्रस, मॉरिशस आणि काही कॅरिबियन देशांचा अपवाद वगळल्यास करांचे दर भारतापेक्षा अन्य देशांतच जास्त आहेत. असे असूनसुद्धा अधिक कर आकारणी करणार्या देशांमध्ये भारतातील श्रीमंत जात असतील, तरत्यामागे येथील असुरक्षिततेचे वातावरण आणि भ्रष्टाचार हा जीवनशैलीचा भाग बनणे हीच कारणे आहेत.
भ्रष्टाचारामुळे देशातून दरवर्षी हजारो श्रीमंत अन्य देशांत स्थलांतर करतात, शिवाय अनेक पात्र विद्यार्थी आणि व्यावसायिक एकदा परदेशात गेले की, भारतात येण्याचे नावच घेत नाहीत. वस्तुतः भ्रष्टाचारामुळे या व्यक्तींना आपल्याच देशात स्वतःचा विकास करण्याची संधीच मिळत नाही. भाषणांमधून आणि आश्वासनांमधून तर असे दिसते की, भारत भ्रष्टाचारापासून दूर जात आहे आणि पारदर्शकता वाढत आहे. परंतु, व्यावहारिक विचार केल्यास भारतात भ्रष्टाचार कायम आहे. अनेक विभागांमध्ये अगदी छोटेसे कामसुद्धा चिरीमिरी दिल्याशिवाय होत नाही. भारतात सामाजिक सुरक्षिततेची परिस्थितीही फारशी चांगली नाही. वाढती गुन्हेगारी आणि धर्म, जात, प्रदेश यावरून होणारे विवादही सर्वसामान्य माणसाला चिंतेत टाकणारे आहेत. या पार्श्वभूमीवर, जे सक्षम आहेत, ते परदेशात स्थायिक होण्यास प्राधान्य देत आहेत.
श्रीमंत लोकांच्या या स्थलांतराकडे सरकारने गांभीर्याने पाहायला हवे. कारण, ही मानसिकता वर्तमानकाळासाठी तर चिंताजनक आहेच, शिवाय देशाच्या भविष्यासाठी ती अधिक चिंताजनक आहे. 2014 पासून आतापर्यंत जे हजारो श्रीमंत भारतातून बाहेर पडून परदेशांत स्थायिक झाले, त्यांनी जेवढी गुंतवणूक परदेशांत केली आहे, तेवढी भारतात केली असती, तर त्यांच्या त्या गुंतवणुकीतून तीन कोटींपेक्षा अधिक भारतीयांना रोजगार मिळाला असता. यातून बेरोजगारीच्या समस्येवर बर्यापैकी नियंत्रण आणण्यास मदत झाली असती. ही स्थलांतरे अशीच सुरू राहिली, तर मात्र आपल्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी गंभीर परिणाम होईल. देशाची प्रतिमा आणि भविष्याच्या पायावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ही स्थलांतरे थांबवायला हवीत.