कोल्हापूर : प्रोत्साहन अनुदान; जाचक अटी रद्द करा | पुढारी

कोल्हापूर : प्रोत्साहन अनुदान; जाचक अटी रद्द करा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना जाहीर केलेल्या प्रोत्साहन लाभ अनुदान योजनेच्या जाचक अटींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 92 हजारांवर शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाचक अटी रद्द करा, अशी एकमुखी मागणी एका ठरावाद्वारे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शनिवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत करण्यात आली. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ होते. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला.

प्रोत्साहन अनुदान योजना अंमलबजावणीचा जीआर शुक्रवारी जारी केला आहे. यानुसार सन 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन आर्थिक वर्षांचा कालावधी विचारात घेतला जाणार आहे. या तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत कर्ज उचल करून नियमितपणे परतफेड केलेले शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत. मात्र, ज्यांनी तीनपैकी एकच वर्ष कर्ज घेऊन परतफेड केलेली आहे, ते यापासून वंचित राहणार असल्याने हा ठराव केल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात ऊस पिकाच्या कर्जाचे प्रमाण 97 टक्के आहे. योजनेच्या लाभासाठी तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्षांतील आर्थिक परतफेड ग्राह्य धरण्यात आली. तीन आर्थिक वर्षांमध्ये दोन हंगामांचे ऊस पीक कर्जाचे वितरण होते. त्यामुळे कर्ज परतफेडीच्या तारखा लगतचा जून महिना व त्यापुढील जून महिना याप्रमाणे निश्चित होतात; पण शासनाच्या निकषानुसार लगतचाच जून महिना कर्ज परतफेडसाठी ग्र्राह्य धरल्यामुळे नियमित परतफेड करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत.

टाळेबंदीमुळे 2019-20 या आर्थिक वर्षात बहुतांशी शेतकर्‍यांनी पीक कर्ज घेतले नाही. त्या शेतकर्‍यांना शासनाने कर्ज घेण्यासाठी मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार शेतकर्‍यांनी कर्जाची उचल पुढील तीन महिन्यांत म्हणजेच दि. 1 एप्रिल 2020 ते दि. 30 जून 2020 या काळात केली आहे. या पद्धतीने कोरोना काळातील म्हणजेच सन 2019 -20 या आर्थिक वर्षातील कर्ज घेतले नाही. तीन महिन्यांतील एकूण 92 हजार 88 शेतकरी या योजनेपासून वंचितच राहणार आहेत. त्यामुळे या निकषात बदल करावा, असे शासनाला पाठविलेल्या ठरावात म्हटले आहे.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आ. राजूबाबा आवळे, आ. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, आ. राजेश पाटील, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, अमल महाडिक, ए. वाय. पाटील, भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, रणजितसिंह पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर आदी संचालक उपस्थित होते.

Back to top button