कोल्हापूर महापालिका निवडणूक : इच्छुकांच्या ‘जोडण्या’ सुरू | पुढारी

कोल्हापूर महापालिका निवडणूक : इच्छुकांच्या ‘जोडण्या’ सुरू

कोल्हापूर ; सतीश सरीकर : महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इच्छुकांनी ‘सेफ’ प्रभाग निवडले आहेत. पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना असल्याने ‘एकगठ्ठा’ मतदानासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ‘तुल्यबळ’ उमेदवार कोण कोण आहेत, याची माहिती घेऊन इच्छुकांनी ‘जोडण्या’ सुरू केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या मैदानात उतरण्यावर ठाम असलेल्या माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. कोणताही ‘दगाफटका’ होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

घुसखोरीसाठीही चाचपणी…
आता खर्‍या अर्थाने महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आरक्षित प्रभागामुळे प्रत्येक प्रभागातील चित्र स्पष्ट झाले आहे. ज्या ठिकाणी मातब्बर इच्छुकांना हवे तसे आरक्षण निश्चित झाले नाही, त्यांनी शेजारच्या प्रभागात ‘घुसखोरी’साठी चाचपणी सुरू केली आहे. कारण गेली दोन-चार वर्षे निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी खर्चही झाला आहे. परिणामी शेजारच्या प्रभागातील तरुण मंडळे, तालीम संस्थांसह कार्यकर्त्यांचा अंदाज घेतला जात आहे. तगडे उमेदवार कोण आहेत, त्याठिकाणी मतांची गोळाबेरीज होऊ शकेल काय, यासाठी चर्चा केली जात आहे.

तगड्या उमदेवारासाठी पक्षाकडून फिल्डिंग…

राजकीय पक्षातूनही धामधूम सुरू झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडी रणांगणात असणार आहे. महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे आ?वश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षातील कारभारी मंडळी त्या-त्या प्रभागातील तगड्या उमेदवारांच्या संपर्कात आहेत. निवडून येऊ शकणार्‍यांना प्राधान्य देऊन त्यांना आपल्याकडूनच लढण्यासाठी गळ घातली जात आहे. प्रसंगी निवडणूक खर्चाचा भार उचलण्याबरोबरच निवडून आणण्याचीही ग्वाही दिली जात आहे. एकूणच सर्व अर्थाने सक्षम असलेल्या उमेदवारासाठी पक्षांकडूनच फिल्डिंग लावण्यात येत आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग या सर्वांचा समावेश आहे.

सण-उत्सवाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न…

सध्या सण-उत्सव सुरू आहेत. श्रावणाला प्रारंभ झाला आहे. दर आठवड्याला एखादा सण आहे. त्याचे औचित्य साधून सोशल मीडियावर स्वतःचा फोटो, प्रभाग क्रमांकासह भागातील मतदारांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याबरोबरच भागातील चौकाचौकांत होर्डिंगही उभारले जात आहेत. मंदिरासमोरही शुभेच्छांचे फलक लावण्यात येत आहेत. एकूणच सण-उत्सवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इच्छुकांतून केला जात आहे. सोशल मीडियाचाही त्यासाठी आधार घेण्यात येत आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासून एक प्रभाग रचनेनुसार निवडणुका होत होत्या. परंतु राज्य शासनाने बहुसदस्य प्रभाग रचना पद्धतीने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापुरात त्रिसदस्य प्रभाग रचना अंमलात आली आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार नगरसेवक 92 होणार आहेत. प्रत्येकी तीन नगरसेवकांचा 30 आणि दोन नगरसेवकांचा 1 असे 31 प्रभाग करण्यात आले आहेत. पूर्वीच्या तीन-तीन प्रभागांचा एकेक मतदारसंघ झाल्याने तब्बल 15 हजार ते 19 हजार मतदारांची संख्या गेली आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच पै-पाहुणे, मित्रमंडळींबरोबरच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

निकाल काहीही लागू दे, निवडणूक होऊन जाऊ दे!

महापालिका सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 ला संपली. त्यानंतर कोरोनाच्या कालावधीतही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. परिणामी इच्छुकांनीही खर्चासाठी ‘हात सैल’ सोडले होते. मात्र निवडणुकीला स्थगिती मिळाली. त्यानंतर पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पुन्हा प्रक्रिया थांबली. गेल्या दीड-पावणेदोन वर्षात कार्यकर्त्यांनी मात्र इच्छुकांना आर्थिकद़ृष्ट्या चांगलेच धुतले आहे. वेगवेगळ्या मदतीसह जेवणावळी, सहलींचाही त्यात समावेश आहे. कार्यकर्ते आणि तरुण मंडळे आपल्याकडे राखण्यासाठी इच्छुकांकडूनही त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र आता इच्छुक उमेदवारांतून खर्च करून वैताग आलाय… काहीही निकाल लागू दे… पण निवडणूक होऊन जाऊ दे… अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आरक्षण सोडत झाली तरीही काहींनी अद्याप पत्ते ओपन केलेले नाहीत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र मागे पडायचे नाही, असा निर्धार केल्याची चर्चा आहे.

Back to top button