कोल्हापूर : स्वाईन फ्लूची धास्ती, डेंग्यूचा डंख अन् कोरोनाचा ‘ताप’ | पुढारी

कोल्हापूर : स्वाईन फ्लूची धास्ती, डेंग्यूचा डंख अन् कोरोनाचा ‘ताप’

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात एकीकडे स्वाईन फ्लूची धास्ती वाढली आहे. डासांचा डंख तर जीवघेणा ठरू लागला आहे. कोरोनाचा ताप दिवसागणिक वाढत आहे. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पोटदुखी यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.

ऊन-पावसामुळे साथीच्या तापाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तापाच्या प्राथमिक लक्षणांकडे होणारे दुर्लक्ष हे इतर साथीच्या आजारांचे कारण ठरत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, घसादुखी अशा प्रकारच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. स्वाईन फ्लू, कोरोना, डेंग्यूचा ‘ताप’ कायम आहे. स्वाईन फ्लूने गेल्या पंधरा दिवसांपासून डोके वर काढले आहे. कोरोना रुग्णसंख्या जून महिन्यापासून वाढू लागली आहे. डेंग्यू डासांचा उच्छाद मार्चपासून सुरू आहे. चिकुनगुनियामुळे तर रुग्णांचे अंग मोडून निघाले आहे.

स्वाईन फ्लू संसर्गाचे रुग्ण हातकणंगले, गडहिंग्लज, करवीर तालुका आणि कोल्हापूर शहरात आहेत. तसेच रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग येथील रुग्णांचा देखील बाधितांमध्ये समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण कोल्हापूर शहर, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शिरोळ, गडहिंग्जल, कागल तालुक्यात अधिक प्रमाणात वाढून येत आहेत. तर आजरा, चंदगड, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात रुग्णांची संख्या थोडी कमी आहे. कोरोना संसर्गाचा वेग आणि मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची शोध मोहीम थंडावली आहे. नमुने तपासणीची संख्या देखील कमी झाली आहे. डेंग्यू बाधित गावाचा, परिसराचा सर्व्हे करून रुग्ण शोध आणि तपासणीवर भर दिला आहे. स्वाईन फ्लूच्या बाबतीत मात्र म्हणावी तशी शोध मोहीम, स्वच्छता, जनजागृती व आरोग्य विभागाचा डोळेझाकपणा सुरू आहे.

स्वाईन फ्लू हॉटस्पॉट हातकणंगले : भेंडवडे, हातकणंगले, हुपरी करवीर : वाकरे, पाचगाव, सांगवडेवाडी राधानगरी : ठिकपुर्ली
कोल्हापूर शहर : कसबा बावडा, मंगळवार पेठ, प्रतिभानगर, जाधववाडी, कदमवाडी, जाधव पार्क, मोरेवाडी, राजारामपुरी

डेंग्यू हॉटस्पॉट
शहर : कसबा बावडा, राजारामपुरी, यादवनगर, मोरे-माने नगर, जवाहर नगर, सिद्धार्थ नगर, फुलेवाडी, मंगळवार पेठ, विक्रमनगर, सीपीआर, राजारामपुरी, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, शाहूपुरी, मार्केट यार्ड परिसर, कदमवाडी, बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ

ग्रामीण भाग ः आकनूर, मजरे कासारवाडा, कसबा तारळे (राधानगरी), हातकणंगले, आळते, टोप, पुलाची शिरोली, इचलकरंजी, कबनूर, निळेवाडी, सावर्डे, खोची, किणी, चोकाक (हातकणंगले), कणेरी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, कोगिल, कळंबा, नेर्ली, सरनोबतवाडी, कावणे, दर्‍याचे वडगाव, शिंगणापूर, शिये (करवीर), व्हन्नूर, कसबा सांगाव, साके, मुरगूड, वड्डवाडी, कागल, मळगे खुर्द, मळगे बुद्रुक (कागल), जोतिबा, कोडोली (पन्हाळा), गारगोटी (भुदरगड), कामेवाडी (चंदगड), नांदणी, शिरोळ, जयसिंगपूर, घोसरवाड, गणेशवाडी (शिरोळ).

Back to top button