कोल्हापूर : सीपीआरचे अत्याधुनिक शवागृह शेंडा पार्कात | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरचे अत्याधुनिक शवागृह शेंडा पार्कात

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार आता शेंडा पार्कात गतीने सुरू आहे. वैद्यकीय शिक्षणाचा प्रत्येक विभाग दर्जेदार करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. विद्यार्थ्यांना एकाच छताखाली वैद्यकीय शिक्षणाचे धडे मिळावेत आणि जागेअभावी सीपीआरमधील विभाग शेंडा पार्कात स्थलांतरित केले आहे. न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक शवागृहाची शेंडा पार्कात उभारणी सुरू आहे. याचे काम गतीने सुरू आहे.

सीपीआरमध्ये नियमित शवविच्छेदनासाठी येणार्‍या मृतदेहांची संख्या वाढली आहे. तसेच नातेवाईकांचा शोध आणि नातेवाईक येण्यास विलंब होत असल्याने काही तासांसाठी मृतदेह शवागृहात ठेवावा लागतो. सीपीआरमध्ये शवागृहाची स्वतंत्र सुविधा आहे. पण या शवागृहाची अवस्था बिकट झाली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना देखील येथे अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने विशेष प्रयत्न करून नवीन शवागृहाची मागणी केली होती. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने अत्याधुनिक शवविच्छेदनगृह उभारणीचे काम सुरू आहे.

एकाच वेळी शवविच्छेदनासाठी अनेक मृतदेह आले तर विलंब होऊ नये म्हणून येथे पाच दगडी टेबल उभे केले आहेत. 2 वॉकिंग कोल्ड रूम आहेत. 40 मृतदेह ठेवता येतील अशी क्षमता असणारे कोल्ड स्टोअरेज, स्वतंत्रपणे सहा मृतदेह ठेवता येतील अशा अत्याधुनिक शवपेट्यांची सोय आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ट्रेनिग हॉल, पोलिस चौकी, वकील, नातेवाईक यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था येथे केली आहे. शवविच्छेदनाचा रेकॉर्ड विभाग आणि डॉक्टरांसाठी देखील केबिनची उभारणी केली आहे. याच बरोबर हिस्टोपॅथॉलॉजी, रिसर्च लॅबची उभारणी येथे अत्याधुनिक पद्धतीने सुरू आहे.

शवविच्छेदन पाहण्याची सोय

शवविच्छेदनानंतर अनेक शंका नातेवाईक उपस्थित करतात. या शवविच्छेदन विभागात नातेवाईकांसह सर्वांनाच मृतदेहाचे शवविच्छेदन पाहण्याची सोय केली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गॅलरीची उभारणीही येथे केली आहे.

Back to top button