कोल्हापूर : अकरावी प्रवेश अर्जासाठी 30 जुलैपर्यंत मुदत | पुढारी

कोल्हापूर : अकरावी प्रवेश अर्जासाठी 30 जुलैपर्यंत मुदत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरस्तरीय प्रवेश भाग 2 अंतर्गत साठी आजअखेर सुमारे 8 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाखा निवडली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची 30 जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे.

शहरातील 31 कनिष्ठ महाविद्यालयांत 10 हजार 960 जागांसाठी अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश प्रक्रियेंतर्गत भाग 2 साठी 26 जुलैपर्यंत 8 हजार 172 अधिक विद्यार्थ्यांनी शाखा निवड केली आहे. विज्ञान : 5743, वाणिज्य (मराठी माध्यम) : 1370, वाणिज्य (इंग्रजी माध्यम) : 1059 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शाखा निवडली आहे. अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मुख्य केंद्र स.म.लोहिया ज्यु. कॉलेज येथे जाऊन प्रत्यक्ष अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी केले आहे.

‘पॉलिटेक्निक’साठी 28 जुलैपर्यंत मुदत

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेंतर्गत आजअखेर 8 हजारांहून अधिक अर्जांची निश्चिती झाली आहे. जिल्ह्यातील 20 पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 6 हजार 600 प्रवेश जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश अर्ज प्रक्रियेस आतापर्यंत चारवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. 28 जुलैपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज, नाव नोंदणीबरोबरच प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती मुदत आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी यंदा क्षमतेपेक्षा तीन हजार अर्ज आल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असणार आहे.

शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत गुरुवारी (दि. 28) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

आयटीआयच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस 17 जूनपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील शासकीय (12), खासगी (49) असे मिळून 52 आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 6 हजार 300 प्रवेश जागा उपलब्ध आहेत. मात्र क्षमतेपेक्षा जास्त 6 हजार 750 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. अंतिम गुणवत्ता यादी 28 जुलै रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर पहिली प्रवेश फेरी 29 जुलैपासून सुरू होईल, अशी माहिती शासकीय आयटीआयचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी दिली.

शहरस्तरीय प्रवेश वेळापत्रक (प्रथम फेरी)

भाग 1 व 2 साठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे : 30 जुलै
प्रवेश अर्जाची छाननी : 1 ते 4 ऑगस्ट प्रवेशाची निवड यादी तयार करणे : 5 ते 7 ऑगस्ट
प्रवेशासंदर्भातील ऑनलाईन तक्रार करणे : 8 व 9 ऑगस्ट www.dydkop.org
संकेतस्थळावर निवड यादी प्रसिद्ध, प्रवेश निश्चिती :
8 ते 13 ऑगस्ट

Back to top button