महापूर आले-गेले… पुनर्वसन यादी अद्याप बारगळलेलीच | पुढारी

महापूर आले-गेले... पुनर्वसन यादी अद्याप बारगळलेलीच

कोल्हापूर : गौरव डोंगरे : महापुराच्या कवेत येणारे शहरालगतचे पहिलेच गाव म्हणजे पन्हाळा रोडवरील आंबेवाडी. नदीची पाणी पातळी जशी धोकापातळी ओलांडेल तशी गावाची धावपळ सुरू होते. 2019 आणि 2021 च्या महापुराची दाहकता ताजी असली तरी 1989 च्या महापुराच्या अनुषंगाने केलेली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची यादी बारगळल्याचे चित्र आहे.

318 कुटुंब संख्या असणार्‍या आंबेवाडी गावाने आतापर्यंत अनेक पूर, महापूर पाहिले आहेत. पंचगंगा नदीची धोका पातळी (43 फूट) ओलांडली की आंबेवाडीला पाण्याचा घेरा पडतो. गावाला प्रयाग चिखली, वडणगे, पंचगंगा पूल अशा तीनही बाजूंनी पाणी पसरते. हळूहळू बाहेर पडण्याचे मार्गही बंद होतात. आंबेवाडीच्या आधी प्रयाग चिखलीलाही महापुराचा फटका बसतो. पण चिखली ग्रामस्थांचे पुनर्वसन बहुतांशी मार्गी लागल्याचे चित्र आहे.

गाव छोटे… कारभारी मोठे

गावाच्या पुनर्वसनाची यादी बनविण्यामध्ये अनेकदा राजकीय अडचणी आल्याचे ग्रामस्थ सांगतात. यापूर्वी अनेकदा बनवलेल्या यादीवर आक्षेप घेण्याचे प्रकार झाले आहेत. ‘महादेवाच्या’ नावाने प्रसिद्ध असणार्‍या व्यक्तीचा यामध्ये मोठा हस्तक्षेप असल्याचे बोलले जाते. यामुळे ही यादी परिपूर्ण होऊच शकलेली नाही.

महापुरानंतर पुनर्वसनाची आठवण

2019 च्या पुराचा फटका बसल्यानंतर तत्काळ येथील यादी बनविण्याचे आदेश देण्यात आले होते. पण हे काम पूर्ण होण्याच्या आधीच 2021 च्या महापुराचा फटका गावाला बसला. यानंतरही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

सध्या ही यादी बनविण्याचे काम तहसीलदार कार्यालयाकडे सोपविण्यात आले असून दोन आठवड्यांत ही यादी बनविण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Back to top button