कोल्हापूर : महापालिकेने पाट्या टाकल्या | पुढारी

कोल्हापूर : महापालिकेने पाट्या टाकल्या

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे. महापालिका इमारतीलाही खड्ड्यांनी वेढले आहे. आ. सतेज पाटील यांनी आढावा बैठकीत अधिकार्‍यांना झापल्यानंतर प्रशासन गतिमान झाले. खड्ड्यांची डागडुजी सुरू करण्यात आली. मुरूम माती टाकण्यात येत आहे. परंतु त्यामुळे खड्डे मुजण्याऐवजी सर्वत्र चिखलमाती होत आहे. परिणामी रस्त्याचे पॅचवर्क नव्हे… डर्ट ट्रॅक… अशी स्थिती झाली आहे. महापालिकेच्या या पाट्या टाकण्याच्या उद्योगाविषयी वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील काही रस्ते सुस्थितीत आहेत. परंतु अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. वाहनचालकांना कसरत करतच जावे लागते. उन्हाळ्यातच महापालिकेने शहरातील खड्ड्यांचे पॅचवर्क करणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे आहेत. पावसात पाणी साठल्याने खड्डे दिसत नाहीत. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यातच आता मुरूममाती टाकल्याने वाहने स्लीप होत आहेत. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Back to top button