किणी नाक्यावर वारकर्‍यांना टोल फ्री | पुढारी

किणी नाक्यावर वारकर्‍यांना टोल फ्री

किणी ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकर्‍यांना टोलमाफीचा आदेश देऊनही अनेक टोल नाक्यांवर वारकर्‍यांकडून टोल वसुली होत आहे. पण पुणे -बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर मात्र कुणाच्याही आदेशाशिवाय दरवर्षीच टोलमाफी दिली जाते. यावर्षीही वारकर्‍यांची शेकडो वाहने टोल न घेता सोडण्यात येत आहेत.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या पालख्या ज्यावेळी आषाढी वारीसाठी पुण्यातून प्रयाण करतात, त्यावेळपासूनच कोल्हापूर, बेळगाव, कोकणासह कर्नाटकातील हजारो भाविक पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर, जीप आदी वाहनांतून महामार्गावरून जातात. इतर ठिकाणी या वाहनांना टोल आकारला जात होता.

पण पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर मात्र वारीच्या वाहनांना 2006 पासून टोल न घेण्याची परंपरा जपली आहे. यावर्षी मुख्यमंत्री शिंदे यांनी वारीला जाणार्‍या वाहनांना टोल माफी करण्याचा आदेश दिला. यासाठी वारीस जाणार्‍या वाहनांची नोंदणी पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे करून तसे स्टीकर वाहनांवर लावण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाने केले होते. किणी टोल नाक्यावर कोणत्याही स्टिकर अथवा आदेशाविना वाहनांना पूर्वीपासूनच अघोषित टोल माफी दिली आहे.

Back to top button