कोल्हापूर : दिंड्यांची सावली हरवली..! | पुढारी

कोल्हापूर : दिंड्यांची सावली हरवली..!

कोल्हापूर ; विकास कांबळे : पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुुरू तुकाराम महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, असा जयघोष आणि ग्यानबा तुकारामचा गजर करत पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक दिंड्या जात असतात. रस्त्याकडेला असणारी वृक्षराजी वारकर्‍यांना सावली देऊन सुखावत असते; परंतु सोलापूरपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे रस्त्याकडेच्या जवळपास सर्वच झाडांची कत्तल केल्याने जिल्ह्यातून पंढरपूरला जाणार्‍या दिंड्यांची सावली हरवली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी वारकर्‍यांसाठी पाणी, सरबत, वैद्यकीय मदत यासाठी स्टॉल उभारण्यात येत असत. चौपदरीकरणामुळे त्यावरही आता मर्यादा येणार आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून अनेक दिंड्या पंढरपूरकडे जात असतात. याच दरम्यान गुरुपौर्णिमाही असते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक स्वामीभक्त कोल्हापुरातून अक्कलकोटला पायी जात असतात. या दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे ठरलेली असतात. सोबत अन्नधान्य आणि जेवणासाठी लागणारे इतर पदार्थही घेतलेले असतात. भोजनाची व्यवस्था करणारी यंत्रणाही सोबत असते. काही गावांमध्ये भोजनाची सोय केली जाते; परंतु ज्या ठिकाणी व्यवस्था नसते, तेथे वारकरीच स्वयंपाक करतात. प्रामुख्याने शाळा, मंदिरे हीच मुक्कामाची ठिकाणे असतात.

ओसाड माळ, सिमेंटचा रस्ता

पंढरपूर, अक्कलकोटला जाणार्‍या दिंडी मार्गादरम्यान मिरजेच्या पुढे किमान पाचशे मीटरवर तरी एखादे झाड रस्त्याकडेला असायचे. नागजच्या पुढे मात्र रस्त्याकडील झाडांची संख्या काहीशी कमी होत जायची. रस्त्याकडेला एखादे झाड दिसले तरी थकले भागलेले वारकरी तेथे विसावा घेत. सोलापूर ते मिरज मार्गाच्या चौपदीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणामुळे जवळपास सर्व झाडे तोडण्यात आली आहेत. दुष्काळी भाग असल्यामुळे आजूबाजूला ओसाड माळ आणि नजर जाईल तिथंपर्यंत सिमेंटचा रस्ता, अशी सध्याची अवस्था आहे.

Back to top button