निरोगी आरोग्याचे गुपित उलगडणार | पुढारी

निरोगी आरोग्याचे गुपित उलगडणार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या संयुक्‍त विद्यमाने ‘मन, हृदय व शरीर कसे निरोगी ठेवाल’ या विषयावर शुक्रवार (दि. 1) जगद्विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मोहित गुप्‍ता (नवी दिल्‍ली) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘डॉक्टर्स डे’निमित्त दरवर्षी पुढारी व्याख्यानमालेंतर्गत गेली 19 वर्षे हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे.

बदलती जीवनशैली, धावपळीचे व धकाधकीचे जीवन, ताणतणाव, असंतुलित आहार, वाहनांचा, मोबाईलचा तसेच ऑनलाईन प्रणालीचा अतिरिक्‍त वापर यामुळे मानसिक, शारीरिक, हृदयविकार, रक्‍तदाब, मधुमेह, निद्रानाश यासारखे विविध व्याधी वाढत असून एकंदरीतच मनुष्याची अस्वस्थता वाढत चालली आहे. डॉ. गुप्‍ता हे शरीरासह मनासाठी आवश्यक असणारी आहारपद्धती, दैनंदिन जीवनात करावे लागणारे व्यायाम, आनंदी जीवनशैली तसेच सद्य:परिस्थितीतील विविध प्रकारच्या व्याधींवर कशी मात करता येईल?, मनामध्ये भावनिक स्तरावर छोट-छोटे बदल करून आनंदी व समृद्ध जीवनाकडे जाण्याचा मार्ग व्याख्यानाच्या माध्यमातून दाखवणार आहेत.

आजतागायत वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांनी या व्याख्यनमालेतून दिलेला आरोग्य मंत्र लाखो लोकांसाठी आरोग्य संजीवनी ठरत आहे. यामध्ये डॉ. प्रमोद जोग (पुणे), योगी डॉ. संप्रसाद विनोद, डॉ. के. एच. संचेती, आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर, मनोविकार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. प्रेमानंद रामाणी, डॉ. सलीम लाड, डॉ. सतीश गुप्‍ता, डॉ. मनू कोठारी, डॉ. मिलिंद मोडक, डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. आसगावकर, डॉ. भोरास्कर, डॉ. लिली जोशी, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. मदन फडणीस, डॉ. अनंतभूषण रानडे आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांची व्याख्याने झाली. तसेच आरोग्य शिबिरे व ध्यानमय योगासने शिबिर सुरू आहेत. गतवर्षी जगतविख्यात स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या ‘पाठीचा कणा कसा सांभाळल’, या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

बदलती जीवनपद्धती, आहारातील असमतोलपणा, धावपळीचा दिनक्रम यामुळे शारीरिक मानसिक समस्या उद्भवत आहेत. या व्याख्यानात निरोगी आरोग्याचे गुपित आपल्या ओघवत्या शैलीतून डॉ. गुप्‍ता मार्गदर्शन उलगडणार आहेत. उपस्थित श्रोत्यांच्या शंकांचे ते निरसन करणार आहेत. प्रवेश अग्रक्रमानुसार देण्यात येणार असून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक डॉ. संदीप
ज. पाटील यांनी केले.

डॉ. मोहित दयाल गुप्‍ता यांचा परिचय

डॉ. मोहित गुप्‍ता सध्या जी. बी. पंत हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच संसदेच्या आरोग्य संलग्‍नकातील हृदयरोग तज्ज्ञ आहेत. वैद्यकीय कारकिर्दीत 18 हून अधिक सुवर्ण पदके आणि 5 रौप्य पदके मिळवण्याची त्यांची कामगिरी आहे. जागतिक स्तरावर आयोजित केलेल्या अनेक संशोधन चाचण्यांचे ते प्रमुख अन्वेषक आहेत. गेली तब्बल 34 वर्षे ते आरोग्य साधना करत आहेत. जेनेटिक्समधील त्यांच्या उत्कृष्ट संशोधनासाठी भारताचे माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते बिशन स्वरूप युवा शास्त्रज्ञ ऑफ द इयर पुरस्कार 2018 प्रदान करण्यात आला.

कोव्हिड काळात हृदय, मानसिक आरोग्य आणि पोस्ट कोव्हिड हार्ट सिंड्रोमवर कोव्हिडच्या प्रभावाबाबत त्यांनी केलेल्या कार्याचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे. सध्या उच्च रक्‍तदाब, तीव— कोरोनरी सिंड्रोम वरील व्यापक जनुकीय संशोधन करत आहेत. तसेच आरोग्य सेवा कर्मचार्‍यांमध्ये ताण मोजण्यासाठी मशिन लर्निंग व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी राजयोग ध्यान तंत्र वापरत आहेत. डॉ. गुप्‍ता हे लहानपणापासून ब—ह्मा कुमारीज जागतिक अध्यात्मिक विद्यापीठाशी संबंधित असून दररोज राजयोग ध्यानाचा सराव करतात. आपल्या व्याख्यानांमध्ये अध्यात्माच्या वैज्ञानिक पुराव्यांचे वेळोवेळी त्यांनी दाखले दिले आहेत. आजतागायत जगभरात त्यांची 1200 हून अधिक व्याख्याने झाली आहेत.

Back to top button