गरज भासल्यास बफर स्टॉकमधून खते, बियाणे देणार : कृषिमंत्री दादा भुसे | पुढारी

गरज भासल्यास बफर स्टॉकमधून खते, बियाणे देणार : कृषिमंत्री दादा भुसे

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : खते आणि बियाणांची कमतरता भासणार नाही, याचे राज्याचे नियोजन केले आहे. गरज भासल्यास बफर स्टॉकमधून खते आणि बियाणे उपलब्ध करून देऊ, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. कोरोनामुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिला शेतकर्‍यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी प्रयत्न करू, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी सांगितले.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या कृषी विभागाची आढावा बैठक कृषिमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झाली. भुसे म्हणाले, शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना असून शेतकरी आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी 1 हजार कोटींची तरतूद केली आहे. याचा लाभ शेतकर्‍यांनी घेऊन या पिकांची उत्पादकता वाढवावी. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेप्रमाणे मागणीनुसार पिके घ्यावीत. आवश्यक तेवढ्या पाण्याचा वापर करून जमिनीचा पोत सुधारा, ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा करणार्‍या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर जादा दर देण्याबाबत प्रयत्न असल्याचे सांगत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ महिला शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी 50 टक्के निधी राखीव ठेवला आहे. कोल्हापुरी गुळाच्या नावावर अन्य राज्यातील गुळाची विक्री होऊ नये, यासाठी उपाययोजना करू. गुळ, आजरा घनसाळ या उत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यासाठी प्रयत्न करू.

चंदगड भागातील काजूच्या जीआय मानांकनासाठी प्रयत्न करू. शिरोळ व हातकणंगले तालुक्यात संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरू होण्यासाठीही सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले. ‘कृषी संजीवनी सप्ताह’ निमित्ताने गावपातळीपर्यंत शेतकर्‍यांशी संवाद साधला जाईल तसेच ‘किट’ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, या भागात शेतकरी विविध नावीन्यपूर्ण प्रयोग राबवित आहेत.कृषी विभागाच्या सर्व अधिकार्‍यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘ऊस उत्पादकता वाढ मोहीम’ सुरू आहे. शेतकर्‍यांना अल्प काळाचे पीक उत्पादन, नवीन जोडधंदे याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.

विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ आदी उपस्थित होते.

पेरणीसाठी गडबड नको

पाऊस पडल्याखेरीज पेरणीसाठी गडबड करू नका, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले. राज्यात आतापर्यंत केवळ दीड टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मान्सूनपूर्व जोरदार पाऊस झाल्याने राज्यात पेरणी कामाला वेग आला होता. त्यानंतर राज्यात मान्सूनचे आगमन झालेही. मात्र, गेल्या तीन आठवड्यांत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वमूवीवर कृषी मंत्री भुसे म्हणाले, गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत तीन टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा हे प्रमाण दीड टक्के इतके आहे. त्यामुळे पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नका. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होईल, आघाडीतील घटक पक्षात कोणतीही धुसफूस नाही, असे सांगून भुसे म्हणाले, शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्री उद्या मुंबईत एकत्र येणार होते.

मात्र, ते सर्वजण शुक्रवारीच रात्री मुंबईत दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा हॉटेलच्या बिलासाठी ताफा अडविण्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे, याबाबत विचारता त्यावर बोलण्याचे भुसे यांनी टाळले.

Back to top button