मी काम करणारा खासदार : धनंजय महाडिक | पुढारी

मी काम करणारा खासदार : धनंजय महाडिक

कोल्हापूर : दुसर्‍याने केलेल्या कामावर जाऊन फोटोसेशन करायची मला सवय नाही. मी बोलणारा नव्हे, तर काम करणारा खासदार आहे, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना लगावला.

धनंजय महाडिक यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी कागल तालुक्यातील एका कार्यक्रमात ‘आम्ही केलेल्या कामाचे श्रेयही उद्या महाडिक घेतील. सगळी कामे मीच केल्याचे सांगतील’, अशा शब्दांत निशाणा साधला होता.

खासदार मंडलिक यांनी केलेल्या टीकेला खासदार महाडिक यांनी सोमवारी उत्तर दिले. खासदार म्हणून 2014 ते 2019 या कालावधीत मी आणलेल्या विकास कामांचे उद्घाटन खासदार मंडलिक व इतर मंडळी करत आहेत. मी खासदार असताना मुंबई, अहमदाबाद, तिरुपती, हैदराबाद अशा पाच ठिकाणी विमानसेवा सुरू केली होती. त्यापैकी आता एका ठिकाणी सुरू आहे. चार ठिकाणी विमानसेवा बंद आहे. सात ते आठ नवीन रेल्वे गाड्या सुरू केल्या. त्याही आता बंद झाले आहेत. महाडिक म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत खासदार मंडलिक यांनी केलेल्या विकासकामांची यादी जाहीर करावी. मंडलिकांनी कोणाचं तरी एकूण खोटं बोलणं बंद करावे.

Back to top button