कोल्हापूर : आरक्षण झाले, लढती ठरल्या | पुढारी

कोल्हापूर : आरक्षण झाले, लढती ठरल्या

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने लढती निश्चित झाल्या आहेत. आरक्षण जाहीर होताच प्रभागांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाल्याने इच्छुकांची यंत्रणा कार्यरत झाली आहे.

कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका आता होणार आहेत. स्थानिक पातळीवर प्रचंड ईर्ष्या आहे. दोन वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार असल्याने नगरपालिकांच्या निवडणुकांना कमालीचे राजकीय महत्त्व आले आहे.

जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरूंदवाड, वडगाव, पन्हाळा, मलकापूर, कागल, मुरगूड, गडहिंग्लज या नऊ नगरपालिकांमध्ये निवडणुकांची धामधूम आतापासूनच सुरू झाली आहे. इचलकरंजी महानगरपालिका झाली असली, तरी त्याबाबत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने नगरपालिका समजून इचलकरंजीच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी केली जात आहे.

स्थानिक पातळीवरचे नेते नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी एकत्रितपणे मेार्चेबांधणी करत आहेत. वाढदिवसाचे निमित्त साधून इच्छुक आतापासूनच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. कार्यकर्त्यांचा वाढदिवस शोधून चौकाचौकांत केक कापण्याचे कार्यक्रम होत आहेत. या माध्यमातून संपर्क मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. बहुतेक ठिकाणी जागा एक आणि इच्छुक अनेक, अशी स्थिती निर्माण झाल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना नेत्यांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

आपला कोण आणि खात्रीने निवडून येणारा कोण? याचे आडाखे बांधले जात असून, बहुतेक नेत्यांचा तरुण चेहर्‍यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे कार्यकर्तेही उमेदवारीसाठी नेत्यांच्या संपर्कात आहेत. आतापासूनच उमेदवारीसाठी त्यांनी कंबर कसली आहे. निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नेत्यांना निमंत्रित करून शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम प्रभागाप्रभागांमध्ये सुरू झाला आहे. त्यातूनच आता रात्रीही जागू लागल्या आहेत.

Back to top button