इचलकरंजी : गर्भलिंग चाचणी करताना डॉक्टरला रंगेहाथ पकडले | पुढारी

इचलकरंजी : गर्भलिंग चाचणी करताना डॉक्टरला रंगेहाथ पकडले

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणीला बंदी असतानाही गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा प्रकार इचलकरंजीतील विकली मार्केट परिसरातील काटकर मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल येथे उघडकीस आला.

‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे कारवाई करीत डॉ. भाऊसाहेब काटकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. डॉ. काटकर याच्या रुग्णालयावर केलेली ही दुसरी कारवाई आहे. कारवाईमध्ये सुमारे 10 लाखांहून अधिक किमतीचे सोनोग्राफी मशिन जप्‍त करण्यात आले असून, सर्व रेकार्डही ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ माजली आहे.

काटकर हॉस्पिटलमधील कागदपत्रांची तपासणी करताना पथक.

निर्भया पथकाकडे तक्रार

येथील कागवाडे मळा परिसरात डॉ. भाऊसाहेब काटकर याचे काटकर मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल नावाने रुग्णालय आहे. या ठिकाणी प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याबद्दलची तक्रार निर्भया पथकाकडे प्राप्‍त झाली होती. त्या अनुषंगाने इचलकरंजी पोलिसांच्या निर्भया पथकाकडून स्टिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये निर्भया पथकाच्या प्रमुख तेजश्री पवार, संदीप घाटगे, पोपट आवळे यांचा समावेश होता.

गर्भपातासाठी 25 हजारांची मागणी

काटकर हॉस्पिटलमधील सोनाग्राफी मशिन सील करताना पथक.

निर्भया पथकाने एका महिला एजंटशी संपर्क साधला. त्या माध्यमातून पथक काटकर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्या ठिकाणी प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान होत असल्याचे उघडकीस आले. यावेळी गर्भलिंग निदान करताना डॉ. भाऊसाहेब काटकर हा अलगद जाळ्यात सापडला. गर्भलिंग निदानासाठी डॉ. काटकरने 21 हजारांची रक्‍कम स्वीकारल्याचे निष्पन्‍न झाले. त्यापाठोपाठ डॉ. काटकरने गर्भपातासाठी महिलेकडे 25 हजारांची मागणी करून त्यांना सायंकाळी येण्यास सांगितले.

ही कारवाई होताच अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही. पी. देशमुख, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र शेट्ये, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार पोखरकर, गर्भलिंग निदान पथकाच्या कायदेशीर सल्‍लागार अ‍ॅड. गौरी पाटील, व्ही. एस. शिंदे आदींनी रुग्णालयावर छापा टाकला.

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

डॉ. काटकर याची कसून चौकशी करण्यात येत होती. रुग्णालयातही शोधमोहीम राबविण्यात आली. डॉ. काटकरने गर्भलिंग निदानासाठी वापरलेले सोनोग्राफी मशिन सील करून जप्‍त करण्यात आले. रुग्णालयातील रजिस्टर व इतर कागदपत्रेही यावेळी पथकाने ताब्यात घेतली असून, त्याची तपासणी केली जात आहे. दिवसभर ही कारवाई सुरूच होती. यावेळी 21 हजारांची रोकड आणि तपासणी साहित्य जप्‍त करण्यात आले. या कारवाईमुळे शहरात विशेषत: वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या कारवाईतील पुरावे थेट न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक विलास देशमुख यांनी दिली.

2009 च्या कारवाईतून निर्दोष

डॉ. काटकर याच्या लक्ष्मी मार्केट परिसरात असणार्‍या रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या तक्रारीवरून आरोग्य विभागाने 2009 मध्ये कारवाई केली होती. या खटल्यातून डॉ. काटकर याची पत्नी डॉ. वैशाली काटकर हिची निर्दोष मुक्‍तता झाली आहे. त्यानंतर डॉ. काटकरने कागवाडे मळा परिसरात 27 फेब्रुवारी 2018 रोजी रुग्णालयाचा परवाना घेऊन स्वमालकीच्या इमारतीत दवाखाना सुरू केला होता. या ठिकाणीही रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून डॉ. काटकर दाम्पत्याची इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सायंकाळी उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात येत होती.

एका महिलेचा गर्भपात केल्याचे उघड

रुग्णालयात गर्भलिंग निदानाबरोबर गर्भपातही केला जात असल्याचा संशय अधिकार्‍यांकडून व्यक्‍त करण्यात आला. दिवसभर आरोग्य विभागाच्या पथकाला चौकशी दरम्यान, रेकॉर्डवरून एका महिलेचा गर्भपात केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. मात्र, अर्भक मृत असल्याने गर्भपात केल्याची माहिती डॉ. काटकर याने दिली असून, त्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांनी दिली. यावेळी रुग्णालयातून गर्भपातासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्‍त करण्यात आले.

इचलकरंजीत वर्षातील दुसरा प्रकार

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे डिसेंबर 2020 मध्ये डॉ. अरविंद कांबळे याला गर्भलिंग निदान करताना पकडले होते. यावर्षी जुलै महिन्यात करवीर तालुक्यातील परिते येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र चालविल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात आला. त्यानंतर इचलकरंजीतील आजचा या वर्षातील दुसरा प्रकार उघडकीस आला. पोलिसांकडून स्टिंग ऑपरेशनद्वारे कारवाईचा हा शहरातील पहिलाच प्रकार आहे.

महिला एजंटसह रिक्षाचालक ताब्यात

गर्भलिंग निदान करण्यासाठी रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. हा प्रकार उघडकीस आणताना स्टिंग ऑपरेशनवेळी पथकाने एका महिला एजंटशी संपर्क साधला. ही महिला इचलकरंजीतीलच असून, तिच्यासोबत असलेल्या एका रिक्षाचालकालाही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडेही कसून चौकशी केली जात आहे.

Back to top button