कोल्हापूर जिल्हा बँकेची रणधुमाळी ऑक्टोबरमध्ये? | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँकेची रणधुमाळी ऑक्टोबरमध्ये?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर बँकेची निवडणूक रणधुमाळी ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांवर असलेली स्थगिती शासनाने उठवली आहे. तसेच मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून येत्या दोन दिवसांत आदेश काढण्याची शक्यता आहे.

त्यानंतर मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यासाठी आणखी 15 ते 20 दिवसाचा अवधी लागेल, अशी शक्यता आहे. यावरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रणधुमाळी ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांशी जिल्हा बँकेच्या निवडणुकांना शासनाने 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती. याबाबत सातार्‍यातील काही संस्था प्रतिनिधींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने सहकारातील सर्वच संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत स्थागिती देण्यात आली होती. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरण आदेश काढत असते. येत्या दोन दिवसांत प्राधिकरण आदेश काढले, असा अंदाज आहे. त्यानंतर मतदार यादी तयार करण्याचे उर्वरित काम सुरू होईल. त्यानंतर मुख्य निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज आहे.

बँकेच्या 11 हजार संस्था सभासद

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मार्च महिन्यात प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी बँकेच्या पात्र संस्था सभासदांकडून ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू होती. ठराव दाखल करून घेणे आणि मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया 45 दिवस चालते. त्यात हरकती दाखल करून घेणे, चुकीची माहिती पुन्हा भरून घेणे, अशी प्रक्रिया केली जाते. बँकेच्या 11 हजार संस्था सभासद आहेत. त्यापैकी 8 हजार 500 संस्थांनी आपले ठराव दाखल केले आहेत.

Back to top button