कोल्हापुरात 20 तास संततधार | पुढारी

कोल्हापुरात 20 तास संततधार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर शहरात गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाची तब्बल वीस तास संततधार सुरू होती. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने काहीशी उसंत घेतली. या 20 तासांत शहरात 56 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 36.77 मि.मी. पाऊस झाला. पावसाने पंचगंगेच्या पातळीतही वाढ झाली. मे महिन्यात जिल्ह्यात प्रथमच सलग पाऊस आणि नदी पातळीत वाढ झाली आहे.

शहरात तीन ठिकाणी झाडे पडली. त्यामध्ये एका चारचाकीचे नुकसान झाले. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला. तासभर धुवाँधार सरी बरसल्या. त्यानंतर जोर कमी झाला. यामुळे तास – दोन तासांत पाऊस थांबेल असे वाटत होते. मात्र पावसाने थांबण्याचे नावच घेतले नाही. सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळतच राहिला. पावसाची संततधार आज दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू होती. यामुळे पावसाळ्यासारखी स्थिती ऐन मे महिन्यात झाली होती.

आजही सकाळपासून पाऊस सुरूच होता. यामुळे छत्र्या, रेनकोट आदी घेऊनच लोक घराबाहेर पडत होते. सलग कोसळणार्‍या पावसाने छत्री, रेनकोट खरेदीसाठीही शुक्रवारी दुकानांत गर्दी झाल्याचे चित्र होते. पावसामुळे बाजारपेठा, दुकाने, भाजी मंडई आदी ठिकाणी तुलनेने आज गर्दी कमी होती. शासकीय कार्यालयांतही तशीच काहीशी परिस्थिती होती. सकाळपासून पावसाचा जोर कमी-जास्त होत होता. मात्र, पाऊस थांबत नव्हता. दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. यानंतर काही काळ पाऊस पूर्ण थांबला. त्यानंतर तुरळक सरी अधूनमधून पडत होत्या. दिवसभर पावसाने वातावरणातील गारठा वाढला होता.

पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. काही ठिकाणी गटारी तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांची, दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. मैैदानांसह सखल भाग, बागा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सार्वजनिक गणेश विसर्जन करण्यात येणारी इराणी क्रशर खण दिवसभरात निम्म्याहून अधिक भरली होती. जयंती नाल्यासह शहरातील बहुतांशी नाले दुथडी भरून वाहत होते.

कोल्हापूर शहरात गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते शुक्रवारी दुपारी अडीचपर्यंत सुमारे 20 तासांत 56 मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 36.77 मि.मी.पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पाऊस कागल तालुक्यात 52.43 मि.मी. इतका नोंदवला गेला. चंदगड तालुक्यात 48.33 मि.मी., हातकणंगलेत 48 मि.मी. करवीर तालुक्यात 46 मि.मी., आजर्‍यात 45 मि.मी., शिरोळ तालुक्यात 42.43 मि.मी., पन्हाळ्यात 40 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 35 मि.मी., गगनबावड्यात 34.50 मि.मी., भुदरगडमध्ये 26.16 मि.मी., राधानगरीत 17 मि.मी.तर शाहूवाडीत 5 मि.मी.पावसाची नोंद झाली.
सलग 20 तास झालेल्या पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ झाली. गुरुवारी सकाळी आठ वाजता 13.9 फुटांवर असणारी पाणी पातळी गुरुवारी सकाळी आठ वाजता 14.3 फुटांवर गेली. सायंकाळी ती 14.9 फुटांवर गेली.

ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा फील

ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा फील नागरिकांनी घेतला. सलग दोन दिवस पाऊस, संपूर्ण पावसाळी वातावरण, रेनकोट, छत्र्या आदी खरेदीसाठी झालेली गर्दी, ठिकठिकाणी साचलेले पाणी आदी संपूर्ण वातावरण पावसाळ्यासारखे झाल्याने मान्सून केरळात पोहोचण्याऐवजी आधी कोल्हापुरात आला की काय, असे विनोदही सोशल माध्यमातून फिरत आहेत.

मुसळधार पाऊस व वादळी वार्‍याने रुईकर कॉलनी व जवाहरनगर येथील यल्लम्मा मंदिर परिसरात दोन झाडे कोसळली. रुईकर कॉलनीतील घटनेत आलिशान मोटारीचे तीन लाखांचे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी दोन्हीही घटना घडल्या. सुदैवाने प्राणहानी टळली.
मनपा अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले रुईकर कॉलनीतील झाड कोसळल्याने पुणे येथील आनंद सुरेश गोखले
(कोथरुड) यांच्या मोटारीची मोठी हानी झाली. जवानांनी कटर लावून झाड्याच्या फांद्या तोडल्या. दोन्हीही ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

मे महिन्यात प्रथमच उच्चांकी बरसला

मे महिन्यात वीस तासांहून अधिक काळ सलग उच्चांकी पाऊस कोसळल्याची ही जिल्ह्यातील आजवरची पहिलीच घटना असावी. सलग दोन दिवस इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचीही अलीकडील पहिलीच वेळ असेल, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.

Back to top button