बाप-लेकांनी बनवली बॅटरीवरील सायकल | पुढारी

बाप-लेकांनी बनवली बॅटरीवरील सायकल

कुंभोज : सचिन भानुसे

पेट्रोलचा वाढता दर आणि किमती दुचाकी यावर पर्याय म्हणून कुंभोज (ता. हातकणंगले) येथील माळी पितापुत्रांनी ‘इकोफ्रेंडली’ दुचाकीची निर्मिती केली आहे. सुरेश शामराव माळी व त्यांचा मुलगा प्रथमेश सुरेश माळी या दोघांनी मिळून बॅटरीवर चालणार्‍या इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती केली आहे. ही सायकल संपूर्णतः बॅटरीवर चालणारी असून ती चालविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या इंधनाची आवश्यकता नाही.

साधारणपणे चार ते पाच तासाला दोन युनिट वीज लागते. आठ रुपयांच्या युनिटमध्ये ही सायकल सुमारे 180 किलोमीटर पळते. या सायकलला 350 व्होल्टची मोटर जोडण्यात आली आहे. 24 व्होल्टची बॅटरी बॅकअप जोडलेला आहे. अ‍ॅक्सिलेटर, हॉर्न, हेडलाईट, क्लचही देण्यात आला आहे. त्यामुळे सायकलवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. दोन चाकी गाडीचा जेवढा वेग आहे तेवढाच वेग या सायकललाही आहे. त्यामुळे पेट्रोलला जाणारे पैसे वाचणार आहेत. केवळ चार ते पाच तास चार्जिंग केल्यानंतर बॅटरी पूर्ण क्षमतेने चार्जिंग होते. चार तास चार्ज केल्यानंतर ही सायकल सुमारे 180 किलोमीटर व जास्तीत जास्त ताशी 50 किलोमीटर वेगाने धावते.

बॅटरी व सायकल असा एकूण खर्च 20 हजारांचा आहे. ही सायकल चालविताना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. ही सायकल दैनंदिन कामकाजासाठी वापरत असून 100 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार केले असल्याचे सुरेश माळी यांनी सांगितले. सुरेश माळी यांचे शिक्षण बी.ई. झाले आहे तर प्रथमेश सध्या 12 वीचे शिक्षण एम.जी.शहा विद्यामंदिर येथे घेत असून तो आयटीआय इलेक्ट्रिशियनचे शिक्षणही घेत आहे.

  • आठ रुपयांत 180 किमी चालते
  • ताशी 50 किलोमीटर धावते

लहानपणापासूनच सायकलची आवड आहे. मोटारसायकलला येणार्‍या समस्या व पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेऊन पर्यावरणपूरक सायकल बनविली आहे. ही सायकल सध्या कामावर जाताना-येताना वापरत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या खर्चात बचत होत आहे.
– सुरेश माळी

Back to top button