इचलकरंजी : बांधकाम कामगारांना ‘संसार सेट’ | पुढारी

इचलकरंजी : बांधकाम कामगारांना ‘संसार सेट’

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू असताना काही संघटनांनी अस्त्विात नसलेल्या ‘संसार सेट’ योजनेच्या नावाखाली परस्पर फॉर्म छापून बांधकाम कामगारांची नोंदणी सुरू केली आहे. या माध्यमातून एका फॉर्मपाठीमागे एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत पैसे उकळले जात आहेत.

राज्य सरकारने बांधकाम कामगारांना स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. राज्यातील 40 लाख कामगार या मंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेत आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ‘सेफ किट’ योजना सुरू होती. जिल्ह्यातील एक लाख 63 हजार नोंदीत कामगारांना लाभ देण्यात येत आहे. 31 मार्च रोजी योजना बंद झाली आहे. तरीही जिल्ह्यातील काही बांधकाम कामगार संघटना बनावट योजना तयार करून कामगारांची नोंदणी करीत आहेत. यासाठी विशिष्ट प्रकारचा फॉर्म छापण्यात आला आहे.

‘संसार सेट’ असे या योजनेचे नामकरण केलेले आहे. एका फॉर्मसाठी एक हजार ते दीड हजार रुपये उकळले जात आहेत. आतापर्यंत 8 ते 10 हजार कामगार या फसव्या योजनेला बळी पडलेले आहेत. याबाबत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे तज्ज्ञ सदस्य कॉ.भरमा कांबळे, मदन मुरगुडे, आनंदा गुरव, राजेंद्र निकम यांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत अशी कोणतीही योजना सुरू नाही. तरी बांधकाम कामगारांनी नोंदणी, नूतनीकरण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनेच करावे.

– अनिल गुरव, सहायक कामगार आयुक्त

फसव्या संघटनांच्या आमिषाला कामगारांनी बळी पडू नये. असा कोणता प्रकार आढळल्यास अधिकृत संघटनांशी संपर्क साधावा.

– कॉ. भरमा कांबळे, लालबावटा बांधकाम कामगार संघटना 

 

Back to top button