कॉग्रेसचे भाजपला चोख ‘उत्तर’ | पुढारी

कॉग्रेसचे भाजपला चोख 'उत्तर'

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या, महाविकास आघाडी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस हेच कोल्हापूरचे ‘उत्तर’ ठरले. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 19 हजार 307 मताधिक्याने विजयी झाल्या. या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली ती पालकमंत्री सतेज पाटील यांनी. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत आघाडीने आपली जागा कायम राखत प्रतिस्पर्धी भाजपला चोख ‘उत्तर’ दिले.

महाविकास आघाडीची सर्व ताकद जयश्री जाधव यांच्यामागे उभी करत जाधव यांना कोल्हापूरच्या पहिल्या आमदार बनण्याचा बहुमान मिळवून दिला. यानिमित्ताने महाविकास आघाडीची जिल्ह्यातील ताकद आणखी भक्कम झाली आहे. विजयी उमेदवार जाधव यांना 97 हजार 332 इतकी तर पराभूत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना 78 हजार 25 इतकी मते मिळाली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यासह अन्य उमेदवारांचा सुपडा साफ झाला. या उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला सर्वाधिक 1,796 इतकी मते मिळाली.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी मंगळवारी (दि. 12) 61.19 टक्के मतदान झाले होते.जयश्री जाधव यांनी 2015 ते 2020 या कालावधीत भाजपकडून सम्राटनगर प्रभागातून महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. शनिवारी राजाराम तलावाशेजारी असलेल्या जलसंपदा विभागाच्या गोदामात मतमोजणी झाली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत मतमोजणी संपली. मात्र दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम सुरू होत नसल्याने त्या मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिनमधील चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. यानंतर दुपारी चार वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी निकाल घोषित केला.

कसबा बावड्यातून सुरुवात…

कसबा बावड्यातील कोल्हापूर शुगर मिल विद्यालयातील (जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय) मतदान केंद्रापासून मतमोजणी सुरू झाली. न्यू पॅलेसपर्यंत तिसर्‍या फेरीअखेर 33 मतदान केंद्रांवरील मतमोजणीत महाविकास आघाडीच्या जाधव यांनी 7 हजार 501 मतांची आघाडी घेतली. मात्र, पुढच्या चौथ्या फेरीपासून जाधव यांची मते कमी होत गेली. यामुळे चौथ्या आणि पाचव्या फेरीत जाधव यांचे मताधिक्य कमी होऊन ते 6 हजार 758 इतके झाले.

चौथ्या फेरीपासून कदम यांचे मताधिक्य वाढू लागल्याने भाजप समर्थकांत आनंदाचे वातावरण पसरले. मात्र, त्यांचा हा आनंद क्षणभंगूर ठरला. पुढच्या फेरीत जाधव यांनी जोरदार मुसंडी मारत 1 हजार 717 इतके मताधिक्य घेतले. पुढच्या फेरीतही 1 हजार 201 मते जाधव यांना जादा मिळाली. त्यामुळे त्यांचे आठव्या फेरीअखेर मताधिक्य 9 हजार 676 इतके झाले.

ताराबाई पार्क, रुईकर कॉलनीत कदम यांना पसंती

रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, नागाळा पार्क या परिसरात कदम यांना मतदारांनी पसंती दिली. या परिसरातील मतमोजणी होत असलेल्या आठव्या ते दहाव्या फेरीत कदम यांना जादा मते मिळाली. यामुळे जाधव यांची 9 हजार 676 वर गेलेली मतांची आघाडी 8 हजार 23 पर्यंत कमी झाली.

टाकाळा परिसरात जाधव यांची आघाडी पुन्हा वाढू लागली. राजारामपुरी, उद्यमनगर, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, रविवार पेठ, शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, शनिवार पेठ, अकबर मोहल्ला, टाऊन हॉल, बुरूड गल्ली, तोरस्कर चौक, बुधवार पेठ, सिद्धार्थ नगर, पंचगंगा तालीम, खोलखंडोबा आदी परिसरात जाधव यांना चांगली मते मिळाली. यामुळे जाधव यांची 8 हजारांवरील आघाडी 15 व्या फेरीपर्यंत 13 हजार 938 वर पोहचली.

शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ परिसरात कदम यांना जादा मते मिळाली. 16 आणि 17 व्या फेरीत कदम यांचे मताधिक्य 902 झाले. यामुळे जाधव यांची 13 हजार 739 इतकी आघाडी 13 हजार 46 पर्यंत कमी झाली. यानंतर 18 व्या फेरीपासून पुन्हा जाधव यांचे मताधिक्य वाढू लागले.

पुढच्या प्रत्येक फेरीला जाधव यांनी आघाडी घेत 96 हजार 176 इतकी मते घेतली. सत्यजित कदम यांना 77 हजार 426 इतकी मते मिळाली. यानंतर 604 टपाली आणि सैनिकांची 8 मते मोजण्यात आली. त्यातही जाधव आघाडीवर राहिल्या. एकूण 612 मतदानापैकी 316 मते जाधव यांना तर कदम यांना 219 मते मिळाली. जाधव यांना एकूण 97 हजार 332 मते मिळाली. प्रतिस्पर्धी भाजपचे कदम यांना 78 हजार 25 मते मिळाली.

दोन केंद्रांवरील ईव्हीएम बंद; चिठ्ठ्यांद्वारे मोजणी

मतमोजणीच्या 19 व्या फेरीत गंजी माळ, जुना वाशी नाका रोडवरील साने गुरुजी विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 224 चे ईव्हीएमच सुरू झाले नाही. 23 व्या फेरीत सुसरबाग, लक्ष्मीपुरी येथील डॉ. झाकीरहुसेन ऊर्दू मराठी स्कूलमधील खोली क्रमांक 2 मध्ये असणार्‍या 273 केंद्रांचे ईव्हीएम बंद राहिले. या दोन्ही केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली. तिथेही जाधव यांना सर्वाधिक मते मिळाली होती. मतदानादिवशीही 224 केंद्रावरील व्हीव्हीपॅट बंद पडले होते. त्याठिकाणी दुसरे मशीन बसवण्यात आले होते.

पाच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी

ईव्हीएमवरील मते आणि त्या मशिनला जोडलेल्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात आली. याकरिता उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठ्या टाकून 26-अ, 162, 208, 280-अ आणि 282 या पाच केंद्रांवरील चिठ्ठ्यांची मोजणी झाली. चिठ्ठ्या आणि ईव्हीएमवर पडलेली मते एकच असल्याची यावेळी खात्री करण्यात आली.

कार्यकर्त्यांत उत्सुकता आणि हुरहुरही

सकाळी सात वाजल्यापासून कार्यकर्ते उमेदवार प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रांवर होते. कोणी कोणत्या टेबलसमोर थांबायचे हे निश्चित होते. त्यानुसार प्रत्येक फेरीनुसार मोजलेली केंद्रनिहाय मते लिहून घेतली जात होती. यानंतर त्याची एकत्र आकडेवारी करून फेरीनिहाय मते अन्य कार्यकर्त्यांना सांगितली जात होती. भाजपचे समर्थक भगव्या टोप्या घालून आले होते. प्रत्येक फेरीला कार्यकर्त्यांत उत्सुकता आणि हुरहुरही होती. सकाळी 11 च्या सुमारास 15 फेर्‍या झाल्या, यानंतर निकालाचा कल स्पष्ट झाला. यानंतर विरोधी उमेदवारांच्या समर्थकांत शांतता होती. जाधव यांच्या समर्थकांनी दुपारी एक वाजल्यापासूनच घोषणा देण्यास आणि गुलाल उधळण्यास सुरुवात केली. दुपारी दोननंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रासमोर येऊन विजयाचा जल्लोष करत होते. मतमोजणी केंद्रांत मोबाईलला बंदी होती. यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थताही होती. मात्र, तरीही अनेकजण विविध मार्गाने मतदान केंद्रांतील आकडेवारी बाहेर पोहोचवत होते.

करुणा मुंडेंना 133 मते

नॅशनल सोशालिस्ट पार्टीचे यशवंत शेळके यांना 318, लोकराज्य जनता पार्टीचे विजय केसरकर यांना 158 तर वंचित बहुजन आघाडीचे शाहिद शेख यांना 466 मते मिळाली. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार्‍या करुणा मुंडे यांना 133 मते मिळाली. सुभाष देसाई यांना 95, बाजीराव नाईक यांना 64, भारत भोसले यांना 43, मनीषा कारंडे यांना 48, अरविंद माने यांना 51, मुस्ताक मुल्ला यांना 89, राजेश नाईक यांना 114, राजेश कांबळे यांना 108 तर संजय मगाडे यांना अपक्षांमध्ये सर्वाधिक 233 मते मिळाली. नोटाला 1 हजार 788 मते पडली.

Back to top button