हुपरी येथील उद्योजकाची चांदी हडप करण्याचा प्रयत्न | पुढारी

हुपरी येथील उद्योजकाची चांदी हडप करण्याचा प्रयत्न

रेंदाळ ; पुढारी वृत्तसेवा : हुपरी येथील सयाजीराव सिल्व्हर फर्मचे सेलम (तमिळनाडू) येथून आलेले सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 50 किलो चांदीचे पार्सल हडप करण्याच्या उद्देशाने देण्यास टाळाटाळ करणार्‍या एका चांदी उद्योजकासह चौघांच्या विरोधात हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चांदी उद्योजक अभिजित ऊर्फ अभिषेक देवकुमार सौंदते, संदीप शांतिनाथ शेटे, पृथ्वीराज राजाराम गायकवाड व स्वामी शहाजी देशमुख (सर्व रा. हुपरी) अशी गुन्हा झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सचिन लिंगाप्पा शिंत्रे यांनी दिली आहे.

चांदीचे दागिने तयार करण्यासाठी आवश्यक असणारे डिझाईन्स व साखळी आदी साहित्य तमिळनाडू राज्यातील सेलम येथून तयार करून घेण्यात येते.

सयाजीराव सिल्व्हर फर्म यांनी त्यांना आवश्यक असणारे सुमारे २० लाख रुपये किमतीचे ५० किलो चांदीचे साहित्य मागविले होते.

सेलमहून आलेली चांदीची पार्सल चांदी उद्योजक अभिषेक सौंदते यांच्या दुकानात ठेवण्यात आली होती.

सयाजीराव सिल्व्हर फर्मचे कर्मचारी ही पार्सल आणण्यासाठी गेले असता सौंदते यांनी देण्यास टाळाटाळ केली.

याबाबत हुपरी पोलिस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्याकडे याप्रकरणी दाद मागण्यात आली.

जिल्हा पोलिसप्रमुख बलकवडे यांनी आदेश देताच हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अद्याप कोणावरही अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही.

हे ही पाहा : 

Back to top button