मुंबई, पुढारी ऑनलाईन: नारायण राणे यांच्या मुलांसारखी मुलं कुणाच्या पोटी असू नयेत. नारायण राणे यांच्या मुलांना आपण कुणाबद्दल काय भाषा वापरतो याचं त्यांना अजिबात भान नसतं, असे वक्तव्य शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
त्यांच्या वक्तव्यांवरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हे भाष्य केले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले,'नारायण राणे यांना मी सल्ला देऊन काहीच फायदा नाही. त्यांची जी मुलं आहेत त्याबद्दल न बोललेलं बरं.
महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत, असाच प्रत्येक आई-बाप म्हणेल.
पक्ष वेगळे असले तर महाराष्ट्राच्या राजकारणात थोरामोठ्यांचा आदर करण्याची संस्कृती आहे.
पण आपण कोणाबद्दल कोणती भाषा वापरतो याचे भान राणे यांच्या मुलांना नाही.
शिवसेना आणि राणे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, 'शिवसेनेच्या वाढीवमध्ये नारायण राणे यांचा काडीचा हातभार नाही.
त्यांनी स्वतःभोवती वलय तयार केले आहे. माध्यमांनी मोठे केलेले ते नेते आहेत. शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन त्यांनी आपलं अस्तित्व टिकवले आहे.
यापेक्षा नारायण राणेंचा काही करिश्मा नाही. राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत नऊ आमदार गेले.
मात्र, दुसऱ्या निवडणुकीत एकही निवडून आला नाही. त्याच्य पुढच्या निवडणुकीत ते स्वत: हरले. त्यांचा मुलगा हरला.
वांद्र्यातून उभे राहिले, तेथेही हरले. त्यानंतर त्यांनी पक्ष काढला आणि वर्षाच्या आत बंदही केला. ते आणि त्यांची मुले कुठेही निवडून येत नाहीत म्हणून ते भाजपच्या वळचणीला गेले आहेत, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.
हेही वाचलं का ?