कोल्हापूर ; सुनील कदम : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका चुकीमुळे कोल्हापूर शहराला कायमस्वरूपी महापुराच्या खाईत लोटल्याची बाब आता चव्हाट्यावर आली आहे.
सातारा ते कागल या महामार्गाचे सहापदरीकरण करताना पूर्वी केलेल्या चुका दुरुस्त कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्राची लाईफलाईन असलेल्या मुंबई-बंगळूर या महामार्गाचा श्वास मोकळा होणार नाही.
स्व. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना मुंबई-बंगळूर महामार्ग क्रमांक चारच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम करण्यात आले आहे.
या महामार्गाच्या कोल्हापूर शहरातून जाणार्या मार्गाच्या रुंदीकरणाची ज्यावेळी चर्चा सुरू झाली, त्यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापुरातील अधिकार्यांनी एक संकल्पना मांडली होती. त्यानुसार नागाव ते सरनोबतवाडीदरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित होता.
या उड्डाणपुलावरून कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी तावडे हॉटेलपासून उड्डाणपुलाचा एक फाटा शहरात प्रवेश करण्यासाठी प्रस्तावित होता. तर दुसरा फाटा सरनोबतवाडी येथून शहरात येणार होता. सांगलीकडे जाण्यासाठीही उड्डाणपुलाचा एक फाटा सोडण्यात येणार होता.
मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी जादा खर्चाच्या कारणावरून हा प्रस्ताव रद्द केला आणि जुन्या पुलाला समांतर पूल आणि ठिकठिकाणी भराव टाकून नवीन रस्त्याचा प्रस्ताव मंजूर केला.
परिणामी, पंचगंगा पुलापासून दक्षिण-उत्तर बाजूने प्रचंड भराव पडत गेला आणि पंचगंगेच्या पावसाळ्यातील परंपरागत प्रवाह मार्गात जवळपास चार-पाच किलोमीटरचा जणू काही बांधच घातला गेला.
या महामार्गाचे काम झाले नव्हते त्यावेळी पंचगंगेला पूर किंवा महापूर आला की, पुराचे पाणी नदीपात्रासह रस्त्यावरून पलीकडे वाहून जात होते आणि अल्पावधीत पूर ओसरत होता; पण महामार्गाचे चौपदरीकरण करताना प्रचंड भराव टाकल्यामुळे महापुराचे पाणी खाली वाहून जायला फक्त आणि फक्त पुलाखालूनच मार्ग राहिला आहे.
महापुराचे प्रचंड पाणी केवळ पुलाखालून वाहून जाणे शक्य नसल्यामुळे ते पाणी साचून राहते आणि आजूबाजूच्या परिसरात पसरते आणि महापूर जणू काही मुक्कामाला आल्याप्रमाणे दहा-पंधरा दिवस ओसरतच नाही.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी सुचविल्याप्रमाणे जर नागाव ते सरनोबतवाडीदरम्यान उड्डाणपूल झाला असता, तर पंचगंगेच्या पावसाळ्यातील परंपरागत प्रवाह मार्गात भरावाचा अडथळा आला नसता आणि पुराचे पाणी उड्डाणपुलाखालून सहज वाहून गेले असते.
राज्यातील बांधकाम विभागाच्या काही अधिकार्यांनी या भरावाचा धोका त्याचवेळी लक्षात आणून दिला होता. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी महामार्गाचे सहापदरीकरण करताना प्रस्तावित उड्डाणपूल करण्याचे मान्य केले होते.
सातारा ते कागल या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या भागातील प्रचंड रहदारी विचारात घेता हे काम तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सहापदरीकरणाचे काम करताना मूळ संकल्पनेतील नागाव ते सरनोबतवाडी हा उड्डाणपूल नव्याने बांधण्याची गरज आहे.
त्याचप्रमाणे हा उड्डाणपूल बांधत असताना पूर्वी या मार्गावर टाकण्यात आलेला भराव तातडीने हटविण्याची आवश्यकता आहे. हा भराव हटविल्याशिवाय कोल्हापूरचा महापुराचा धोका कमी होणार नाही.