पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोणावळा येथील डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर दरोडा टाकला होता. याप्रकरणी आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने तब्बल २४ दिवस मध्य प्रदेशात तळ ठोकून ९ जणांना अटक केली. तर आतापर्यंत १५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दरोडा प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांनादेखील ताब्यात घेतले आहे.
आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी चक्क त्यांच्याच गावात मजुराचे काम केले. यावेळी त्यांच्याकडून २३ लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ६ लाख २६ हजार रुपयांची रोकड, ५७ हजार ५०० रुपयांचे मोबाईल असा ३० लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या या पैशांमधून आरोपीनी गाड्या, कपडे, मोबाईल अशी मोठी खरेदी केली आहे. काहींनी त्यांच्यावरील कर्ज भागविली. एकाने आपल्या वाट्यातून दीड लाख रुपयांची देणगी गावातील मंदिरासाठी दिली.
हेमंत कुसवाह (वय २४), प्रशांत कुसवाह (वय २७), दौलत पटेल (वय २४), गोविंद कुशवाह १८), प्रदीप धानूक (वय २८, सर्व रा. रहातगड, जि. सागर), नथू विश्वासराव, सुनिल शेजवळ, रवींद्र पवार, शामसुंदर शर्मा, मुकेश राठोड, सागर धोत्रे, दिनेश अहिरे, विकास गुरव, संजय शेंडगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लोणावळा येथील डॉ. हिरालाल खंडेलवाल (वय ७३) यांचे खाली हॉस्पिटल असून वरच्या मजल्यावर ते राहतात. १७ जून रोजी पहाटे एकच्या दरम्यान खिडकीवाटे आत शिरून चोरट्यांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून घरातील ५० लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने असा ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
त्यावेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने खाली हॉस्पिटलमध्ये असलेल्या स्टाफला वरच्या मजल्यावरील घटनेची काहीही खबर मिळाली नाही.
डॉक्टरांनी आपले हातपाय सोडवून घेऊन बेल वाजवून इतरांना याची माहिती दिली. त्यानंतर दरोड्याचा प्रकार उघडकीस आला होता.
दरम्यान, तपासाच्यावेळी पोलिसांना लोणावळा रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून काही जणांची माहिती मिळाली.
त्यावरून पोलिसांनी काही आरोपींना पकडले. त्यांच्याकडील चौकशीतून मध्य प्रदेशातील हेमंत कुसवाह व त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली.
स्थानिक गन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे व त्यांच्या सहकार्यांनी तब्बल २४ दिवस मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात मुक्काम ठोकून यातील प्रमुख सूत्रधारासह आरोपींना अटक केली.
डॉ. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची रोकड असल्याची अफवा गेल्या वर्ष दोन वर्ष मावळ भागात मोठ्या प्रमाणावर आहे.
त्यातूनच हा दरोडा पडला असल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी नवनीत काँवत, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट उपस्थित होते.
डॉ. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यवधीची कॅश असल्याची अफवा पोलिस तसेच आयकर विभागापर्यंत पोहचली होती. गेल्या वर्षी ग्रामीण पोलिसांनी त्याची खातरजमा करुन तसा पंचनामाही केला होता. हे सर्व आरोपी आरे कॉलनीतील चित्रनगरीत कामगार म्हणून काम करतात. त्यातून त्यांचा एकमेकांशी संबंध आला.
नथू विश्वासराव हा मावळ तालुक्यातील औंढोली येथील राहणार असून तो आरे कॉलनीत काम करतो.
डॉ. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याबाबतची माहिती सुनिल शेजवळ याला दिली. त्याने ही माहिती शामसुंदर शर्मा, दिनेश अहिरे यांना दिली.
मुख्य सुत्रधार हेमंत कुसवाह हा आरे कॉलनीत येत असे त्याला हा प्रकार समजला.
त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात काही गुन्हे दाखल आहेत. त्याने दरोड्याचा कट रचला. ते सर्व जण घटनेच्या सायंकाळी रेल्वेने लोणावळ्यात आले.
मध्यरात्रीनंतर भर पावसात ते डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर गेले. स्थानिकांनी त्यांना हा बंगला दाखविला.
खिडकीवाटे प्रवेश करुन १२ जणांनी हा दरोडा टाकला. त्यांना जी माहिती मिळाली, त्यापैकी डॉक्टरांकडे केवळ ५० लाखांची रोकड मिळाली.
रोकड व दागिने त्यांनी आपसात वाटून घेतले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन काळे, उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, अमोल गोरे, सहायक उपनिरीक्षक सुनिल जावळे, शब्बीर पठाण, हवालदार महेश गायकवाड यांनी केली.
हे ही पाहा :