

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात आगामी २०२१-२२ या हंगामात सुमारे १ हजार ९६ लाख मे. टनाइतके ऊस गाळप अपेक्षित आहे. ऊस गाळप वेळेत पूर्ण होण्यास प्राधान्य असून त्यासाठीच्या पुर्वतयारीची महत्वपूर्ण राज्यव्यापी जम्बो आढावा बैठक साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी (दि.29) बोलविली आहे.
आज सकाळी साखर आयुक्त शेखर गायकवाड याच्या अखत्यारित साखर आयुक्तालयात दोन टप्प्यात बैठका होणार आहेत.
सकाळी अकरा वाजता होणाऱ्या बैठकी कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर विभागातील कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
तर दुपारी तीन वाजता होणार्या बैठकीस सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर विभागाची कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
प्रादेशिक साखर सह संचालक, सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक आणि खाजगी कारखान्यांचे सरव्यवस्थापक बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती साखर सह संचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी दिली.
गतवर्षीचा गाळप हंगाम २०२०-२१ मधील उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपी शेतकर्यांना दिल्याच्या माहितीवरही चर्चा होईल.
चालूवर्ष २०२१-२२ मधील पूर्वहंगामी कामाची तयारी, ऊस तोडणी यंत्रणा, कर्ज उपलब्धता या महत्वपूर्ण विषयावर प्रथम चर्चा होईल.
तसेच चालूवर्षी होणारे संभाव्य इथेनॉल उत्पादन, ऊस गाळप परवाना ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपध्दती, साखर कारखाना कामगारांच्या देय रकमा, कारखान्यांचे लेखापरिक्षण पूर्ण करण्यावरही चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.