जलसंपदामंत्री जयंत पाटील रुग्णालयात असूनही घेतली सांगली जिल्ह्याची काळजी | पुढारी

जलसंपदामंत्री जयंत पाटील रुग्णालयात असूनही घेतली सांगली जिल्ह्याची काळजी

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : रुग्णालयात दाखल असूनही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सांगली जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीकडे लक्ष आहे. आपल्या जिल्ह्याच्या जनतेला पूरपरिस्थितीची सध्यस्थितीची सोशल मिडियावरुन त्यांनी माहिती दिली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज (दि.२९) ट्विट करुन पुराबाबत महिती दिली.

पाटील म्हणाले, सांगलीत कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे. ती आणखी कमी होत आहे.

सध्या कोयना धरणात पाणी साठा ९० टीएमसी असून (८७%) धरणातून ३०००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणी साठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवतां येईल.

त्यामुळे कोयना धरणातून सद्याचा ३०००० विसर्ग थोडासा वाढवून ५०००० क्यूसेक्स करण्याचे नियोजन आहे.

तसेच सांगली येथे कृष्णाची पातळी काही प्रमाणात वाढेल परंतू घाबरण्याचे कारण नाही.

मोठा पाऊस जर आला तर तो धरणांतच अडवण आवश्यक आहे.

नागरिकानी काळजी करू नये. यातून जयंत पाटील यांना जिल्ह्यातील जनतेची काळजी असल्याचे स्पष्ट होत आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना बुधवारी दुपारी ब्रिज कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईत दुपारी मंत्री मंडळातील नेत्यांची बैठक होती. राज्यात आलेल्या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

माझी प्रकृती उत्तम

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सूचना केली आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद! अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटर वरुन दिली आहे.

हे ही पाहा : 

Back to top button