कोल्हापूर उत्तर : बंटी-मुन्ना आमने-सामने पुन्हा ! | पुढारी

कोल्हापूर उत्तर : बंटी-मुन्ना आमने-सामने पुन्हा !

कोल्हापूर ; सुनील सकटे : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात 12 एप्रिल रोजी होणार्‍या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पारंपरिक विरोधक पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे महानगर निवडणूक प्रभारी माजी खासदार धनंजय महाडिक पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.

आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसकडून जयश्री जाधव यांची उमेदवारी जवळजवळ निश्‍चित मानली जाते. भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि महेश जाधव यांच्यात चुरस असली तरी सत्यजित कदम यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे.

सतेज पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धनंजय महाडिक यांच्यावर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी दिल्याने या दोघांना आपली ताकद दाखवायची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच मिळत आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेनेच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी मताच्या विभाजनाचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक वरवर पाहता बहुरंगी होणार असली तरी प्रत्यक्षात काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना होणार आहे. या दोन नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाशी निगडित राहणार आहे.

काही काळ या नेत्यांचा राजकीय प्रवास समांतर राहिला आहे. सध्या मात्र त्यांच्यामध्ये कमालीचा दुरावा आहे. परस्परांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आणण्याच्या उद्देशानेच ते एकमेकांशी टोकाचा संघर्ष करीत आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ, जिल्हा परिषद, गोकुळ अशा विविध ठिकाणी सतेज पाटील यांनी महाडिक यांना शह दिला आहे. आता या निवडणुकीच्या निमित्ताने कोण कोणाला शह देणार हा प्रश्‍न आहे.

सतेज पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक

या निवडणुकीत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यावरच अनुक्रमे काँग्रेस व भाजपच्या प्रचाराची धुरा राहणार आहे. परिणामी पुन्हा एकदा यानिमित्ताने सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच संघर्षाचा नवा अध्याय पाहायला मिळणार आहे. याबरोबरच ही निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची असून दोन पाटलांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोणता पाटील बाजी मारणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Back to top button