शिरोळ मध्ये कृष्णा, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली | पुढारी

शिरोळ मध्ये कृष्णा, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली

शिरोळ : पुढारी वृत्तसेवा

शिरोळ मध्ये कृष्णा, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कृष्णा, वारणा, पंचगंगा या प्रमुख नद्यांवरील धरणांतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. तरी देखील शिरोळ विभागात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणीपातळी तासागणिक वाढत आहे.

पंचगंगा (75 फूट) व कृष्णा (60.3 फूट) नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. याशिवाय नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावर चार फूट पाणी आल्याने मार्ग बंद झाला आहे.

स्थलांतरित कुटुंबासाठी गुरुदत्त साखर कारखाना, दत्त साखर कारखाना, पद्माराजे विद्यालय या ठिकाणी शासकीय निवारा छावण्या उभा करण्यात आल्या आहेत. बहुतांशी नागरिकांनी खासगी भाड्याच्या खोलीत स्थलांतर केले. ही आकडेवारी सुमारे 45 हजारच्या आसपास असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले.

दरम्यान जावईवाडी, काळे मळा, पाटील मळा, जनता हायस्कूल, राजाराम शाळा, शाहूनगर, मांगारूडी वसाहत, शिरटी रोडवरील मळा वस्ती भाग, जय शिवराय मंडळ, अजिंक्यतारा मंडळ, धनगर गल्ली, धरणगुत्ती रोडवरील नागरी वस्तीमध्ये पाणी शिरल्याने 900 कुटुंबे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहे. 12 तासांत अनुक्रमे राजापूर 6, शिरोळ 12.1, तेरवाड 9.6, नृसिंहवाडीत 12.9 फुटांनी वाढ झाली आहे.

हिप्परगी, अलमट्टीमुळे फूग

प्रमुख चार नद्यांच्या धरणांतून सध्या जेमतेम पाणी विसर्ग सुरू असून सलग तीन दिवस पाऊस नसतानासुद्धा पाणी पातळीत कमालीची होणारी वाढ होत आहे. राजापूर बंधार्‍यावरून कर्नाटकात होणारा 3 लाख 16 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि हिप्परगी बरोबर अलमट्टीतुन होत असलेला विसर्ग यात तफावत असल्याने, शिरोळ मधील नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Back to top button