कोल्हापूर : कोरोना काळात 371 मुलांचा रुग्णवाहिकेत झाला जन्म | पुढारी

कोल्हापूर : कोरोना काळात 371 मुलांचा रुग्णवाहिकेत झाला जन्म

कोल्हापूर : पूनम देशमुख

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलांना काही रुग्णालयात अँटिजन, तर काही दवाखान्यांत आरटी-पीसीआरची तपासणी करणे बंधनकारक होते. या प्रक्रियेदरम्यान गर्भवतीला प्रसूती वेदना सुरू होऊन कोणत्याही क्षणी प्रसूतीची शक्यता असायची.

त्यातच भर म्हणून आजही स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने तेथील गर्भवतींना जिल्ह्याचा मोठा दवाखाना असणार्‍या सीपीआरकडे ‘रेफर’ केले जाते. कोरोना काळातील 3 वर्षांत आरोग्य विभागांतर्गत 108 क्रमांकाच्या रुग्वाहिकेत 371 मुले सुखरूप जन्मास आली आहेत.

सोबतच एक डॉक्टरही रुग्णवाहिकेत उपलब्ध असल्याने माता व अर्भकांचे प्रसूतीदरम्यान आरोग्य सुविधा उपलब्ध न झाल्याने माता व बाळांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहा अत्याधुनिक तर 28 बेसिक सुविधा असणार्‍या रुग्णवाहिका आहेत. 12 प्रकारच्या सुविधा रुग्णांना पुरवल्या जात आहेत. त्यापैकी ही एक सुविधा आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांचा विचार करता प्रसूती कळा सुरू झालेल्या महिलांना रेफर टू कोल्हापूर करणे, हे काहीसे सूत्र बनले आहे.

या रुग्णवाहिका रुग्णांसाठी जणू जीवदान ठरताहेत. कोरोनाच्या सावटाखाली 2019 मध्ये 207 , 2020 मध्ये 110 तर 2021 मध्ये 54 प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. गर्भवती महिला प्रसूतीसाठी आधी प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तरावरील दवाखाना असा प्रवास करत सीपीआरकडे उपचारासाठी येतात.

दरम्यान प्रसूती कळा सुरू झाल्याने अनेकजणी 108 रुग्णवाहिकेतच प्रसूत झाल्या आहेत. रुग्णवाहिकेत प्रशिक्षित डॉक्टर, औषधे व बेसीक लाईफ सपोर्ट सुविधा उपलब्ध असल्याने प्रसूतीदरम्यान अडचणी आल्या नाहीत. यामुळे सुविधांअभावी माता व अर्भकाचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळाली आहे. – संग्राम मोरे

Back to top button