खोल समुद्रात घोस्ट शार्क याच्या पिल्‍लाचा शोध | पुढारी

खोल समुद्रात घोस्ट शार्क याच्या पिल्‍लाचा शोध

वेलिंग्टन : महासागरांच्या अथांग दुनियेची अनेक रहस्ये आजही मानवाला उलगडता आलेली नाहीत. समुद्राच्या या न्यार्‍या दुनियेत अनेक अनोखे सजीव आढळतात. त्यापैकीच एक आहे घोस्ट शार्क. अर्थात ही शार्कची प्रजाती नसून त्यांच्या कुळाशी संबंधित प्रजाती आहे. तिला ‘चिमेरा’ प्रजाती म्हणूनही ओळखले जाते. हे मासे शार्कसारखे दिसतात; पण आकाराने लहान असतात.

घोस्ट शार्कमध्येही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बहुतेक मासे खोल पाण्यात आढळतात आणि क्‍वचितच समुद्रतटाजवळ येतात. आता अशाच एका माशाच्या नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्‍लाचा खोल समुद्रात शोध लावण्यात आला आहे.

एखाद्या प्रौढ घोस्ट शार्कची लांबी 2 मीटर असते आणि हे मासे जगभर आढळतात. समुद्रतळाशी असलेल्या गोगलगायी व सागरी किड्यांना हे मासे आपले भक्ष्य बनवतात. हे मासे इतके दुर्मीळ आहेत की विज्ञानालाही त्यांच्याविषयी अधिक माहिती नाही. संशोधक अनेक वर्षांपासून त्यांच्यावर संशोधन करीत आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार या माशाच्या पिल्‍लाचा शोध लागणे ही अतिशय दुर्मीळ बाब आहे. याचे कारण म्हणजे हे मासे समुद्रतळाशीच अंडी देतात. न्यूझीलंडच्या एका बेटाजवळ सुमारे 1.2 किलोमीटर खोलीवर या पिल्‍लाचा शोध लागला. डॉ. ब्रिट फानुची या संशोधकाने सांगितले की खोल पाण्यातील प्रजातींना शोधणे अतिशय कठीण असते, विशेषतः घोस्ट शार्क ला. हे मासे बरेच रहस्यमय आहेत आणि ते क्‍वचितच दिसून येतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड अ‍ॅटमॉस्फिरिक रिसर्चच्या संशोधकांनी म्हटले आहे की हा घोस्ट मासा नुकताच अंड्यातून बाहेर पडलेला आहे. त्याच्या पोटात अद्यापही अंड्याचा योक आहे. याच योकच्या सहाय्याने ते अंड्यात आपली भूक भागवतात. सध्या या बेबी घोस्ट शार्कच्या ऊतींचे काही नमुने घेऊन त्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यामधून त्यांच्या जनुकीय संरचनेविषयीची माहिती समजेल. प्रौढपणी त्यांचे वजन व आकार कसा असतो याचीही माहिती समजेल.

Back to top button