

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील उपस्थित होते. या बैठकीत संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रावरील आपल्या आरोपांची काही कागदपत्रे सादर करत दोघांवरही कारवाई करण्याची मागणी केल्याचे समजते. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली असून सोमय्या बाप – बेटे यांना अटक होणार असा दावा केला होता.
गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आणि गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिड तास खलबते केली. या चर्चेत संजय राऊत यांनी आपण केलेल्या आरोपाप्रकरणी किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. आपल्या आरोपांवर आर्थिक गुन्हे शाखेमार्फत कारवाई करता येणे शक्य असल्याचे राऊत यांनी सांगितले तसेच आपल्याकडे आरोपासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे आहेत, याकडे राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री वळसे पाटील यांचे लक्ष वेधले.
त्यावर आता मुख्यमंत्री आणि वळसे – पाटील कोणता निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. मात्र जर संजय राऊत यांच्या आरोपांवर सोमय्या पिता – पुत्रांवर गुन्हा दाखल झाला तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात आणि अशावेळी भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. त्यामुळे हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
वेट अँड वॉच
संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काय घडले यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सूचक विधान केले. मुख्यमंत्र्यांना मी कालही भेटलो होतो, याआधीही भेटलो होतो. मी त्यांना नेहमीच भेटत असतो. याचा अर्थ आहे वेट अँड वॉच, असे राऊत म्हणाले.