

सातारा; साई सावंत : अत्यंत दुर्गम अशा कांदाटी खोर्यात अवघ्या एका घराच्या सेलटी या गावाची कहाणी थरकाप उडवणारी असून त्यांचं जगणंही अंगावर काटा आणणारं आहे. जगापासून कोसो दूर असलेल्या या गावात झोरे हे कुटुंब राहत असून रोजच त्यांना अक्षरश: मरणाचा सामना करावा लागत आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, रानडुक्कर आदी वन्यप्राणी अवती-भवती फिरत असून जीव मुठीत घेवून दररोजचा दिवस ढकलणार्या येथील कुटुंबाचा जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरु आहे.
'कुणीतरी आम्हाला न्याय द्या हो' अशी आर्त हाक हे कुटुंब देत आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या कुशीत अनेक दुर्गम गावे आहेत. त्या गावांचा इतर शहरांशी फारसा संबंधच येत नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना अभयारण्याच्या कुशीला ही गावे आहेत.
सातारा शहरापासून बामणोली हे अंतर साधारण 35 किमी आहे. त्यानंतर सह्याद्रीच्या डोंगरकपारीत वसलेली अनेक गावे आहेत. ही गावे आता कुठे कात टाकत आहेत. असे असले तरी डोंगर कपारीत अनेक गावे नागरी सुविधांसाठीही झगडत असल्याचे वास्तव आहे. त्यापैकीच सेलटी हे गाव आहे. ते दुर्गम अशा कांदाटी खोर्यात असून त्याची कहाणी विदारक आहे. बामणोलीपासून अर्धा ते पाऊण तास बोटींग करून या गावात पोहचता येते.
सेलटी या पूर्ण गावात झोरे आडनावाचे फक्त एकच कुटूंब आहे. हे कुटूंब कोयना धरण होण्यापूर्वीपासूनच तेथे वास्तव्य करत आहे. येथील झोरे कुटुंबियांची तिसरी पिढी येथे वास्तव्यास आहे. या कुटूंबात 12 ते 15 सदस्य आहेत. या गावात शिक्षणाची सोय नसल्याने कुटूंबातील लहान मुलांना शिक्षणासाठी पिंपरी येथे जावे लागते. यासाठी होडी वल्व्हत अर्धा तास प्रवास करत शाळेत जावे लागते.
वादळ, वारे व पाऊस याची तमा न बाळगता ही मुले शिक्षण घेण्यासाठी पिंपरीत जातात. जी बोट ही मुले वापरत आहेत त्यामध्येही अनेकदा पाणी जाते. त्यामुळे आयुष्यावर उदार होवून त्यांना प्रवास करावा लागतो. पिंपरी येथे पोहचल्यानंतरही तेथून झेडपीच्या बोटीने तापोळा येथे जावे लागते. ही बोट न मिळाल्यास तब्बल 9 किमी अंतर पायी तोडत ही मुले शाळेत पोहचतात.
खिरखिंडीसारखा न्याय मिळेल का?
झोरे कुटूंबियांना कोयना धरण झाल्यापासून वीजेसह अन्य मुलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे इतर जगाशी त्यांचा संपर्क तुटलेला आहे. अख्ख्या गावात एकच कुटूंब असल्याने अत्यंत भीतीदायक वातावरणात त्यांना वास्तव्य करावे लागते. त्यांना वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, रानडुक्कर या वन्यप्राण्यांकडून धोका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झोरे कुटूंबिय जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष करत आहेत.
आमच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे झोरे कुटूंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे खिरखिंडीतील मुलींना जसा न्याय मिळाला तसा न्याय झोरे कुटुंबियांनाही मिळावा, अशी मागणी होत आहे. झोरे कुटूंबिय हे अभयारण्याच्या कोअर भागात येत असल्याने त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशीही मागणी होत आहे.