कोरोना आता गंभीर आजाराच्या कक्षेत राहिला नाही! नवा निष्कर्ष | पुढारी

कोरोना आता गंभीर आजाराच्या कक्षेत राहिला नाही! नवा निष्कर्ष

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : दोन वर्षांपूर्वी जगाला हादरवून सोडणार्‍या आणि जगाच्या अर्थकारणाची परिमाणे बदलणारा कोरोना विषाणू आता अंगवळणीचा होऊ पाहतो आहे. या विषाणूच्या उपद्रव क्षमतेचा अंदाज बांधल्यानंतर या विषाणूची थेट मानवावरील चाचणी घेण्यापर्यंत शास्त्रज्ञांची मजल गेली आहे. अलीकडेच अशा प्रकारे घेण्यात आलेल्या एका चाचणीमध्ये या विषाणूपासून उपलब्ध उपचाराआधारे मानवी शरीर सुरक्षित राहू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे करण्यात येणार्‍या चाचण्यांना ‘खुली मानवी चाचणी’ (ओपन ह्यूमन ट्रायल) असे संबोधले जाते. औषध निर्माण शास्त्राच्या क्षेत्रात कोणतेही नवे औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याच्या प्राण्यांवर चाचण्या घेतल्या जातात. या चाचण्या सुरक्षित व परिणामकारक असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच त्याची मानवी जीवांवर चाचणी घेतली जाते.

तसेच मानवी चाचण्यांत संबंधित औषध सुरक्षित आणि परिणामकारक असल्याची खात्री पटल्यानंतर मग संबंधित औषधांच्या खुल्या बाजारातील वापराला अनुमती दिली जाते. कोरोनावर गेल्या दोन वर्षांत अनेक औषधांच्या क्‍लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. त्यांची सुरक्षितता व परिणामकारकता सिद्ध झाल्यानंतर त्याच्या तात्पुरत्या वापरालाही औषधे महानियंत्रकांनी अनुमती दिली होती.

इंग्लंडमध्ये त्याहीपुढचे पाऊल पडले आहे. तेथे मानवाला थेट कोरोना विषाणूचा संसर्ग घडवून निरीक्षण करण्यात आले. या चाचणीमध्ये विषाणूमुळे होणार्‍या या आजारापासून सुरक्षित रहात असल्याचा निष्कर्ष आहे. आरोग्य विज्ञानात एखादा विषाणू थेट मानवाला संसर्गित करून त्याचे परिणाम तपासण्याची कृती अत्यंत दुर्मिळातील दुर्मीळ समजली जाते. त्यातील धोके लक्षात घेता शासनाच्या पातळीवर त्याला अनुमती सहसा दिली जात नाही.

इम्पिरियल कॉलेज, लंडन, ब्रिटिश गव्हर्न्मेंट टास्क फोर्स आणि ओपन ऑर्फन या तीन संस्थांच्या वतीने संयुक्‍तरीत्या हा प्रकल्प घेण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये 18 ते 29 वयोगटातील 36 सशक्‍त तरुण-तरुणींना सहभागी करून घेण्यात आले होते. विलगीकरण कक्षामध्ये या स्वयंसेवकांवर चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये स्वयंसेवकांच्या प्रकृतीच्या बाबतीत कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शिवाय आजारही सुरक्षिततेच्या मर्यादेत राहत असल्याचे स्पष्ट झाले. थेट मानवी चाचणी असे स्वरूप असलेल्या या चाचण्या गेल्या काही दशकांपासून घेतल्या जातात.

आजाराविषयी अधिक माहिती मिळविणे, संशोधनाच्या पुढच्या टप्प्याला पार्श्‍वभूमी तयार करणे आणि उपचारपद्धती व लस विकसित करणे यासाठी या चाचण्यांचा आधार घेतला जातो. यापूर्वी मलेरिया, एन्फ्लुएन्झा, टायफॉईड आणि कॉलरा या आजाराचे विषाणू थेट संसर्गित करून अशा चाचण्या घेण्यात आल्या होत्या. विषाणूच्या उपद्रवमूल्याचा पूर्णपणे अंदाज आल्याशिवाय अशा चाचण्या घेतल्या जात नाहीत. लंडनमधील या प्रयोगाने कोरोना आता गंभीर आजाराच्या कक्षेतून बाहेर पडल्याचे दाखवून दिले आहे.
चांगल्या गुणवत्तेचा मास्क घालणे गरजेचे

कोरोना विषाणू संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक परिणाम नाकावर होतो. त्यामुळे नाक आणि तोंडावाटे कोरोनाचा संसर्ग शरीरात होता. यासाठी बचाव करण्यासाठी गर्दी आणि बंद खोलीत चांगल्या दर्जाचा मास्क घालणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Back to top button