शिरोलीत महामार्गावर पेट्रोल पंपावर दरोडा | पुढारी

शिरोलीत महामार्गावर पेट्रोल पंपावर दरोडा

शिरोली एमआयडीसी ; पुढारी वृत्तसेवा : शिरोली औद्योगिक वसाहतीसमोर महामार्गावर असलेल्या जाजल पेट्रोल पंपावर एका टोळीने धाडसी चोरी केली. त्यांनी दोन कामगारांना मारहाण करून अडीच लाखांची रोकड व मोबाईल असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

महामार्गावर अत्यंत रहदारीच्या ठिकाणी असलेल्या पंपावर धाडसी दरोडा पडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. हा पेट्रोल पंप शिरोली पोलिस ठाण्यापासून थोड्या अंतरावर व रहदारीच्या ठिकाणी असल्याने अशी धाडसी चोरी झाल्याने पोलिसांच्या पेट्रोलिंगचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप गावच्या हद्दीत असणार्‍या जाजल पेट्रोल पंप रात्रपाळीत काम करणार्‍या जयदीश व्यंकटराव कांबळे व कुमार वघ्रे हे दोघे कामावर होते. ते रविवारी रात्री पेट्रोल पंप बंद करून ऑफिसमध्ये झोपले होते. सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 23 ते 25 वयोगटातील अज्ञात चार चोरट्यांनी दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उचकटून ऑफिसमध्ये प्रवेश केला.

त्यांनी कांबळे व वघ्रे यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडून लॉकरच्या चाव्या जबरदस्तीने घेतल्या व लॉकरमधील रोख अडीच लाख, दोन मोबाईल असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज जबरदस्तीने धमकावून नेला. जखमी जगदीश कांबळे व कुमार वाघ्रे यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद जगदीश कांबळे यांनी शिरोली पोलिस ठाण्यात दिली आहे.

Back to top button