

कोल्हापूर : एकनाथ नाईक
रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. परिणामी रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे राज्यातील शेतकर्यांचे अर्थकारणच कोलमडले आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तब्बल 200 ते 700 रुपये इतकी मोठी दरवाढ झाल्याने शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकर्यांवरील संकटाची मालिका सुरूच आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी. यामुळे उत्पादनात तर घट होत आहे; पण उत्पादनवाढीसाठी खर्च हा शेतकर्यांना करावाच लागतो. यंदा तर एकीकडे नुकसान आणि दुसरीकडे अधिकचा खर्च अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे. मध्यंतरीच्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पुन्हा औषध फवारणी करण्याची नामुष्की शेतकर्यांवर ओढवलेली आहे. त्यातच रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने आता पिके जोपासायची कशी, असा सवाल आहे. खतांच्या किमती आवाक्यात आणाव्यात, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
काही कृषी केंद्रांवर जुन्या दराचे लाखो मेट्रिक टन खत शिल्लक असून, या सर्व खतांचा विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी केंद्रांमध्ये शिल्लक असणारे खत जुन्या दराने विक्री होते की नाही, याकडे कृषी विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील एका खत कारखान्याने रासायनिक खतामध्ये गोलमाल केला होता. शेतकर्यांनी कृषी विभागास ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित खत कारखान्याची बनवेगिरी उजेडात आली होती.