शिवसेनेला लढू द्या, राष्ट्रवादीचा कल; कोल्हापूर उत्तरची निवडणूक वेगळ्या वळणावर | पुढारी

शिवसेनेला लढू द्या, राष्ट्रवादीचा कल; कोल्हापूर उत्तरची निवडणूक वेगळ्या वळणावर

कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनानंतर होणारी पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. मात्र, महाविकास आघाडीअंतर्गत ज्या पक्षाचा उमेदवार त्याच पक्षाकडे उमेदवारी देऊन अन्य दोन पक्षांनी मदत करायची असे ठरले होते. मात्र, शिवसेनेने कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असेल तर त्यांना लढू द्या, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर मांडली आहे.

कोल्हापूर उत्तरची निवडणूक वेगळ्या वळणावर

महाविकास आघाडी अस्तित्वात येताना एखाद्या पक्षाचा आमदार पक्ष सोडून गेला किंवा त्याचे अकाली निधन झाले तर ती जागा ज्या पक्षाचा आमदार होता, त्या पक्षाला द्यायची आणि महाविकास आघाडीतील उर्वरित दोन पक्षांनी ताकदीने या उमेदवाराला निवडून आणायचे, अशी भूमिका नेत्यांनी मांडली होती. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या निधनानंतर तिथे अन्य पक्षांनी उमेदवार उभा केला नाही. तीच स्थिती देगलूर बिलोली मतदारसंघाबाबत घडली. तिथे काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात अन्य पक्षांनी उमेदवार दिला नाही. कोल्हापूर उत्तरची निवडणूक जाहीर झाली नसली तरी पक्षांच्या जोर, बैठका सुरू आहेत. कोल्हापूर उत्तरचे दिवंगत आमदार काँग्रेसचे होते. मात्र, येथे शिवसेना निवडणूक लढविणार असल्याच्या भूमिकेत आहे. तशा घोषणा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केल्या आहेत. ऐनवेळी काही निर्णय झालाच तर ‘मातोश्री’चा निर्णय अंतिम असेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

अलीकडेच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीविरोधात पॅनेल उभा केले. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये उभा दावा नसला तरी ताणाताणी आहे. त्यामुळे शिवसेनेला लढायचे असेल तर लढू द्या, अशी भाषा राष्ट्रवादीकडून सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या भूमिकेमागेबरेच अर्थ लपलेले

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादी-काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी व काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांना आवर्जून भेटले. त्यामुळे शिवसेनेला आता लढू द्या, या राष्ट्रवादीच्या भूमिकेमागे बरेच अर्थ लपले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button