भारतीय डाक विभागामार्फत ‘सिंधुदुर्ग किल्ला’ विशेष टपाल पाकिटचे अनावरण | पुढारी

भारतीय डाक विभागामार्फत 'सिंधुदुर्ग किल्ला' विशेष टपाल पाकिटचे अनावरण

मालवण ; पुढारी वृत्तसेवा “सिंधुदुर्ग किल्ला” या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण हा केवळ आपल्या उज्वल इतिहासाचा उत्सवच नाही तर आपला ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला कळावा यासाठी टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. हे एक स्मरणपत्र आहे की आपला भूतकाळ हा केवळ इतिहासापुरता मर्यादित असलेल्या घटनांची मालिका नसून एक जिवंत वारसा आहे.

जो आपल्या वर्तमान आणि भविष्याला आकार देत असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व आणि आपल्या उज्वल इतिहासाचा वारसा जपण्याचा हा पोस्ट खात्याचा एक प्रयत्न आहे. असे भावोद्गार चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल किशन कुमार शर्मा यांनी मालवण प्रधान डाक घर येथे संपन्न झालेल्या भारतीय डाक विभागाच्या “सिंधुदुर्ग किल्ला” या विशेष टपाल पाकिटाच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केले.

दर वर्षी डाक विभागामार्फत देशातील विशेष महत्व असलेल्या ऐतिहासिक वास्तू, संस्था, निवडक उत्पादने, सांस्कृतिक वारसा यांचे विशेष टपाल पाकिटाच्या रूपाने प्रकाशित करून सन्मानित करण्यात येते. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्या बाबत विशेष टपाल पाकिट प्रकाशित करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी घेण्यात आला होता. सदर प्रस्ताव त्वरित मंजुर करण्यात आला. रविवार ९ जून रोजी मालवण प्रधान डाक घर येथे चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल किशन कुमार शर्मा यांच्या हस्ते “सिंधुदुर्ग किल्ला” या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण संपन्न झाले.

यावेळी पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन आर के जायभाये, पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल अमिताभ सिंग, डाक निदेशक (मुख्यालय), महाराष्ट्र सर्कल अभिजित बनसोडे, डाक निदेशक, गोवा रिजन रमेश पाटील यांच्यासह टपाल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजानी 350 वर्षापूर्वी उभारलेल्या भव्य सिंधुदुर्ग किल्ल्याचे विशेष टपाल पाकिट प्रकाशित करताना आनंद होत आहे. हा कार्यक्रम आपल्या ऐतिहासिक वारसा जपण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला सिंधुदुर्ग किल्ला अभूतपूर्व पराक्रमाच्या जाणिवेचा एक पथदीपक म्हणून उभा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याची उत्तुंगता आणि भर समुद्रात उभा केलेला दुर्ग म्हणुन जटिल वास्तुकला ही आपल्या पूर्वजांच्या कारागिरी आणि स्थापत्यकलेचे जिवंत उदाहरण आहे. सदर किल्ल्याला स्वराज्याची नाभिक राजधानी म्हणुन ओळखले जाते व सदर किल्ला मराठा शौर्य व दूर दृष्टीचे प्रतिक मानले जाते.

विशेष टपाल पाकीटाद्वारे या प्रतिष्ठित वास्तूचा इतिहास व महत्व जगासमोर आणण्याच्या प्रवासात पोष्ट खात्याचेही योगदान देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग डाक विभागाने यासाठी घेतलेला पुढाकार आणि परिश्रम हे आम्हाला आज या महत्त्वपूर्ण प्रसंगी घेऊन आले आहेत, जिथे आपण एकत्रितपणे आपला ऐतिहासिक वारसा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करू शकतो. अश्याही भावना या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

सदर कार्यक्रमाचे नियोजन सिंधुदुर्ग विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवण येथील प्रतिभासंपन्न युवा कलावंत पार्थ मेस्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज, किल्ले सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग डाक विभाग या आशयाची काढेलेली रांगोळी लक्षवेधी ठरली.

हेही वाचा :

Back to top button