पालघरमधील समुद्रकिनार्‍यावर जेलीफिशचे थैमान | पुढारी

पालघरमधील समुद्रकिनार्‍यावर जेलीफिशचे थैमान

पालघर; सचिन जगताप : गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पालघर जिल्ह्यात समुद्री क्षेत्रामध्य मोठ्या प्रमाणात जेलीफिशचे थैमान सुरू आहे. त्यामुळे स्थानिक मासेमारांना जेलीफिश जास्त व मासे कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. याचा विपरीत परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे. जेलीफिश मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे काही मच्छीमारांनी आपल्या बोटी बंदरात नांगरून ठेवल्या आहेत.

समुद्रात सर्वत्र जेलीफिशने आक्रमण केल्यामुळे मासेमारी कुठे आणि कशी करायची? असा सवाल उभा राहत आहे. मासेमारीच्या ऐन हंगामामध्ये हा प्रकार सुरू झाल्याने मच्छीमार हवालदिल झाला आहे. जेलीफिशमुळे मासे अत्यंत कमी मिळत असून, जेलीफिशचा भरणा जाळ्यात तिप्पट असल्याने मच्छीमारांच्या आरोग्यालाही धोका उद्भवत आहे. मोठ्या प्रमाणात आढळणार्‍या या जेलीफिशमुळे मच्छीमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होताना दिसत आहे. मच्छीमारांवर येत असलेल्या विविध संकटांत दाहक जेलीफिश हेही एक संकट असून, यामुळे ऐन हंगामात मोठी मासळी मिळणे ठप्प झाले आहे.

जेलीफिशच्या काही जाती असून, ऑस्ट्रेलियन जेलिफिश अत्यंत विषारी असतात. या परिसरातील जेलिफिशचा स्पर्श झाल्यास मोठा दाह होतो. या कारणामुळे समुद्री मासेमारी क्षेत्रात मिळणारे पापलेट, सुरमई, रावस, कुपा, घोळ, कोळंबीसारखी मासळी इतर ठिकाणी स्थलांतर होत असल्यामुळे मासेमारी करताना मच्छीमारांच्या जाळ्यात जेलीफिश व तुरळक मासे हाती येत आहेत. याचा थेट परिणाम माशांच्या दरावरही होत आहे. माशांची आवक घटली की त्यांचे दर वाढतात, त्यामुळे सर्वसामान्य मासे खवय्यांनाही खिशाला भुर्दंड पडतो. मात्र, यात सर्वाधिक नुकसान मच्छीमार वर्गाचे होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जेलीफिशचे मोठ्या प्रमाणातील थवे नोव्हेंबर महिन्यापासून आढळून येतात. उधाण असल्यामुळे थवे समुद्रासह समुद्रकिनारीही आढळतात हे उधाण थांबल्यानंतर जेलीफिश स्थलांतर करून इतरत्र जातात त्यानंतर खर्‍या अर्थाने मासे जाळ्यात मिळतात. चंद्र प्रकाशामुळे किंवा एलईडी पद्धतीच्या मासेमारीमुळे तळाखाली असलेले जेलीफिश सक्रिय होऊन समुद्राच्या पृष्ठभागावर यायला सुरुवात होतात किंवा ते किनारी येऊन सर्वत्र पसरतात अशा परिस्थितीत जाळ्यांमध्ये मासळी मिळणे दुरापास्त होऊन जाते. हे संकट रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची अपेक्षा मच्छीमार व्यक्त करत आहेत.

जेलीफिशमुळे त्वचेचे आजार

या काळामध्ये जेलीफिश मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे मच्छीमार बांधव डिझेल खर्चून समुद्रात जाण्याचे टाळतात. मासेमारी कमी झाल्यामुळे सद्यःस्थितीत मुंबई व गुजरात या परिसरातून मासळी बाजारामध्ये येत आहे. मासेमारी बोटी समुद्रात नेल्यानंतर जाळ्यामध्ये 200 किलो मासे मिळाले तर त्यामध्ये जेलीफिशच जास्त असतात, त्यामुळे समुद्रातून जाळी काढताना मच्छीमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच जेलीफिश व मासे वर्गीकरण करताना मोठा वेळ जातो, त्यामुळे अशावेळी मच्छीमार आपल्या बोटी बंदरातच नांगरून ठेवणे पसंत करतात, त्यातच विषारी जेलीफिश असली की ती हाताने काढून फेकणे धोकादायक असते. दाहक जेलीफिश त्वचेच्या संपर्कात आल्यास खाज किंवा मोठा दाह होतो. त्यामुळे मच्छिमार अशा जेलीफिशपासून दूर राहतात.

गेल्या पंधरा दिवसांपासून समुद्रामध्ये मासेमारी क्षेत्रात जेलीफिशचे थैमान वाढल्यामुळे मासेमारी करणे अवघड बनले आहे. आधीच मासेमारी कमी होत आहे, त्यात जेलीफिशमुळे मासे इतरत्र वळत आहेत. मासेमारी करणे या काळात कठीण होऊन बसले आहे, त्यामुळे मच्छीमार बांधव गेल्या पंधरा दिवसांपासून कमी प्रमाणात मासेमारी करीत आहेत.

– जयकुमार भाय,
अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार सहकारी संघ

Back to top button