सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या 115 दहीहंड्यांचा थरार! | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या 115 दहीहंड्यांचा थरार!

सिंधुदुर्गनगरी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बुधवारी गोकूळ अष्टमी उत्साहात साजरी केला जाणार असून गुरुवारी होणार्‍या गोपाळकाल्याला जिल्ह्यात 115 दहीहंडी बांधल्या जाणार आहेत. 2024 हे पुढील वर्ष निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे यावर्षी राजकीय दहीहंड्याही गाजणार आहेत.

दरवर्षी गोकूळ अष्टमीनंतर येणार्‍या गोपाळकाल्याला दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर संपूर्ण राज्यात 7 फेब्रुवारी रोजी गोपाळकाला साजरा होत आहे. यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 115 ठिकाणी दहीहंडी उत्सव होणार आहे. या दहीहंड्यांमध्ये राजकीय दहीहंड्याही मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. पुढील वर्ष 2024 लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय नेते मंडळींना दहीहंडी हा एक चांगला मार्ग असल्याने ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्याचा निश्चय केला आहे.

भाजपाचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रभारी माजी खासदार नीलेश राणे यांनी कुडाळ येथे पाच लाखाची दहीहंडी बांधण्याचे जाहीर केले आहे.

तर या मतदारसंघातील महत्त्वाच्या ठिकाणी 50,50 हजार रुपयांच्या दहीहंड्या बांधण्याचा निश्चय केला आहे. त्याचबरोबर याच मतदारसंघात गेले दोन टर्म आमदार म्हणून कार्यरत असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आ. वैभव नाईक यांनीही या मतदारसंघात दहीहंड्या बांधण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपा, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्याचबरोबर मनसे यांच्या माध्यमातून दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात प्रतिवर्षाप्रमाणे दहीहंडी बांधत असलेली मंडळे, बाजारपेठा यांच्यामधूनही दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांना हे वर्ष दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नांसाठी चांगले जाणार आहे. मात्र या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

Back to top button