गणपतीपुळे सह अन्य समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन | पुढारी

गणपतीपुळे सह अन्य समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून 16 जूनपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. खवळलेल्या समुद्रात उंच लाटा उठत असून किनार्‍यांवर धडका देत आहेत. त्यामुळे गणपतीपुळेसह रत्नागिरीतील भाट्ये, आरेवारे, नेवरे या किनार्‍यांवर पर्यटकांनी पाण्यात उतरु नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मागील तीन-चार दिवसांपासून बिपरजॉय वादळाचा परिणाम किनार्‍यावर जाणवत आहे. रविवारी भरतीच्यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेने तालुक्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ असणार्‍या गणपतीपुळे येथे मोठा तडाखा दिला होता. यात अनेक पर्यटक पाण्याबरोबर वीस ते पंचवीस फूट किनार्‍याकडे ढकळलेले गेले होते. रस्ता आणि किनार्‍याच्यामध्ये असणार्‍या संरक्षक भिंतीवर उभे असणारे पर्यटकही लाटेच्या मार्‍याने खाली पडले होते. यात किनार्‍यावरील व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले होते.

सोमवारीही वार्‍याचा जोर कायम होता व समुद्र खवळलेला होता. गणपतीपुळेसह तालुक्यातील आरेवारे, भाट्ये, मांडवी, नेवरे या किनार्‍यांवरही लाटांचा प्रचंड मारा होत होता. भरतीच्यावेळी लाटा किनार्‍याला भिडत होत्या. त्यामुळे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पर्यटक व स्थानिक नागरिकांनीही किनार्‍यावर जाऊन पाण्यात उतरु नये असे आवाहन केले आहे. पश्चिम महाराष्ट्र व मुंबईतून आलेले पर्यटक खवळलेल्या समुद्रातही पाण्यात उतरण्यासाठी धडपडत असतात, परंतु अतिरेकपणा करुन स्वत:चा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गणपतीपुळे येथे पोलीसही लक्ष ठेवून आहेत. स्थानिकांकडून पर्यटकांना किनार्‍यावर जावू नये असे आवाहन करण्यात येत आहे. याठिकाणी बोर्डही लावण्यात आले आहेत.

पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी गणपतीपुळे येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव व अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी 49 व्यापार्‍यांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली असून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केले. यावेणी सरपंच कल्पना पकीये, डॉ. विवेक भिडे, अमित घनवटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

-हेही वाचा 

ऑनलाईन ‘गेमिंग’ने धर्मांतर, आराेपीला १५ दिवसांची ‘ट्रान्झिट रिमांड’

पिंपरी : बटाट्याची आवक घटूनही किरकोळ बाजारात दर नियंत्रणात

माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आलेल्या शिरसाटे गावाची सफर

Back to top button