सिंधुदुर्ग : आंगणेवाडी भराडी मातेचा जत्रोत्सव आजपासून सुरू; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती | पुढारी

सिंधुदुर्ग : आंगणेवाडी भराडी मातेचा जत्रोत्सव आजपासून सुरू; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मसुरे; संतोष अपराज : दक्षिण कोकणची काशी आणि कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेच्या जत्रोत्सवास शनिवार 4 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. यात्रेला आंगणेवाडीत भक्तांचा महापूर लोटणार आहे. भराडी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे व विविध पक्षांचे व्हीआयपी उपस्थित राहणार असल्याने याठिकाणी प्रचंड प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी व परिसर गजबजून गेला आहे. यात्रेत 10 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देवी भराडीचा महिमा जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. त्यामुळे आंगणेवाडीच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात आले आहे. यात्रेदिवशी मातेचे तेजोमय रुप पाहून भाविक सुखावणार आहेत. गाभार्‍यामध्ये ओट्या भरण्यासाठी शिस्तबध्द नियोजन आंगणे कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे. सभामंडप व गाभार्‍याचे रुप रेशमी कापडी पडदे, विविध फुलांच्या सजावटीने अवर्णनिय असेच भासणार आहे.

यात्रोत्सवात ओट्या भरण्यास शनिवारी पहाटे 3 वा. प्रारंभ होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर सजविण्यात आला आहे. भाविकांना मौज घडवून आणण्यासाठी आकाश पाळणी, मौत का कुआ वगैरे मनोरंजनाची खेळणी सज्ज झाली आहेत. मालवण, मसुरे व कणकवली स्टँडनजीक पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीनेसुध्दा अखंडित वीज पुरवठ्यासाठी खबरदारी घेतली आहे. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली 6 अभियंता, 40 कर्मचारी कार्यरत आहेत. मालवण एसटी आगाराच्या वतीने 50 यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.मंदिर व मंदिर परिसरात 35 ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ड्रोन कॅमेर्‍याद्वारे यात्रेचे छायाचित्रण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे.यात्रोत्सवात कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे. तसेच टेहळणी टॉवर, साध्या वेशातील महिला व पुरुष कर्मचारी यात्रेवर लक्ष ठेवून असणार आहेत.

देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी नऊ रांगांमधून व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी रात्री 9.30 ते 12 या वेळेत धार्मिक विधीसाठी भाविकांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी संयम व शिस्त बाळगून देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्याचा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पुढीलप्रमाणे -सकाळी 11 . 45 ते 11.50 आंगणेवाडी देवी भराडी दर्शन, 12.50 वा.ओरोस विश्रामगृहातून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण व तेथून मुंबईकडे रवाना, 3.15 वा. मुंबई आगमन व तेथून वर्षानिवास येथे राखीव.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि अन्य मंत्री दुपारी 3 वा.चिपी विमानतळ येथे आगमन होऊन 4 वा. अंगणेवाडी येथे देवी भराडीचे दर्शन त्यानंतर भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती व त्यानंतर मुंबईकडे रवाना होतील.

Back to top button