रत्नागिरी : चिपळुणातील मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे कोकणचे लक्ष | पुढारी

रत्नागिरी : चिपळुणातील मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे कोकणचे लक्ष

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळुणातील शिवसेनेच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे डोळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेकडे लागले आहेत. नवरात्रौत्सवानंतर पुढील महिन्याच्या पंधरवड्यात चिपळूणमध्ये ही विराट सभा होणार आहे. त्या दृष्टीने शिंदे गटातील कार्यकर्ते कामाला लागले असून, ही सभा जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलून टाकणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी शिव संवाद यात्रा जिल्ह्यात आली. या सभेने राजकीय वातावरण ढवळून निघाले. शिवसेना नेते आ. भास्कर जाधव व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात कलगीतुरा रंगला. जिल्ह्यातील तीन मतदारसंघात रत्नागिरी, दापोली व चिपळूणमध्ये मोठी फूट पडणार आहे. त्यामुळे या सभेला महत्त्व आले आहे. कोकणातील ही सभा मोठी होईल, असा विश्वास शिंदे गटातील समर्थक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही सभा ठरणार असून, त्याकडे जिल्ह्यासह कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

येथील शिवसेनेचे माजी आ. सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात जाण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह ते प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्याआधी ते आपल्याबरोबर आणखी कोणाला गळाला लावतात याची उत्सुकता आहे. त्यांचे समर्थक गावागावात, वाड्यावस्त्यांवर संपर्क करीत आहेत. शिवसेना अंतर्गत नाराज असणार्‍या कार्यकर्त्यांना आपल्या बरोबर जोडत असून, अनेक ठिकाणी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना प्रतिसाददेखील मिळत असून, या बंडाळीचे लोण चिपळूण तालुक्यासह गुहागर तालुक्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांवर चिपळुणातील बंडाळीचा परिणाम होणार आहे. त्यात शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले आणि गत निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आमदारकीची निवडणूक लढविलेले सहदेव बेटकर हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे चिपळुणातील सभेत कुणबी समाजबांधंवासहीत बेटकर यांचा मोठा प्रवेश होणार आहे, अशी चर्चा आहे. यामुळे या सभेकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत.

चिपळूण हे जिल्ह्यासाठी मध्यवर्ती केंद्र आहे. शहरातील पवन तलाव मैदानात ही सभा होण्याची शक्यता असून, या ठिकाणी हा विराट प्रवेश होणार आहे असे बोलले जात आहे. त्या दृष्टीने कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. बंडाळीच्या पार्श्वभूमीवर मूळ शिवसेनेतील पदाधिकार्‍यांचा खांदेपालट झाला आहे. तालुका प्रमुखपदी विनोद झगडे यांची निवड करण्यात आली तर माजी उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके यांची हकालपट्टी करून त्या जागेवर प्रताप शिंदे यांना बढती देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सेनाअंतर्गत बंडाळी कशी रोखली जाते हे महत्त्वपूर्ण आहे. या मेळाव्यात कोणते पदाधिकारी, लोकप्रतिनिधी प्रवेश करतात हे औत्सुक्याचे ठरणार असून त्यावरच बंडाळीची तीव्रता स्पष्ट होणार आहे.

काही काठावर तर काहींना प्रतीक्षा

शिंदे गटाला चिपळुणातून किती प्रतिसाद मिळतो हे महत्त्वपूर्ण आहे. माजी आ. सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात जाण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर शिवसेनेसह अन्य पक्षातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते काठावर आहेत. कदाचित त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश होऊ शकतो. शिवेसेनेच्या चिन्हाबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. कोणाची सेना खरी आणि कोणाची खोटी याचा न्यायनिवाडा व्हायचा आहे. त्याचीही अनेकांना प्रतीक्षा असून या नंतरच समर्थन कोणाला द्यायचे या विचारात कार्यकर्ते आहेत.

Back to top button