रत्नागिरी : रिफायनरी समर्थकांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष | पुढारी

रत्नागिरी : रिफायनरी समर्थकांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारसू धोपेश्वर पंचक्रोशीमध्ये रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी दिवसागणिक वाढत असतानाच प्रकल्प समर्थकांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. राजापूर तालुक्यातच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. दरम्यान, प्रकल्प समर्थकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदने पाठविण्यात आली असून, त्यांचेही रिफायनरी प्रकल्पाबाबत लक्ष वेधण्यात आले आहे.

या देण्यात आलेल्या निवेदनात रिफायनरी प्रकल्पाबाबतची सत्यस्थिती आजवर कशी दडविली गेली, कसे गैरसमज पसरविले गेले त्यावर प्रकाशझोत टाकताना प्रकल्प परिसरात येऊन एनजीओंकडून होत असलेली दिशाभूल याचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी उद्योगमंत्र्यांकडे करताना भविष्यात कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी रिफायनरी प्रकल्प निश्चितच फायदेशीर ठरेल, त्यामुळे राजापुरातून प्रकल्प बाहेर न जाता तो तालुक्यातच मार्गी लागावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाची जागा कमी करण्यात आली असून, त्यासाठी साडेचार हजार एकर जागा आवश्यक असणार आहे. त्यापैकी तीन हजार एकर जागेची संमत्तीपत्रे शेतजमीन मालकांनी 13 जून 2022 ला जिल्हा कार्यालयात सादर केली आहेत.

एमआयडीसीच्या प्रस्तावित अधिग्रहणाच्या क्षेत्रात बहुतांशी जमीन ही कातळाची असून त्यामध्ये कोणतेही गाव, वाडी, वस्ती मंदिर यांचे विस्थापन होत नाही. शिवाय कोणतेही कुटुंब विस्थापित होणार नाही. त्यामुळे प्रकल्प मार्गी लावताना कोणतेच अडथळे येणार नाहीत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे रिफायनरीबाबत मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरविण्याचे काम झाले, असे आरोप त्या निवेदनात करण्यात आले आहेत. ज्या ग्रामस्थांच्या जमिनी प्रकल्प क्षेत्रात जात नाहीत किंवा ज्यांचा त्या भागाशी कसलाच संबंध नाही, अशी मंडळी विरोधासाठी सातत्याने पुढे असतात. खोटा विरोध दाखविला जातो, त्यामुळे वस्तुस्थिती दडविली गेल्याचा आरोप त्या निवेदनात करण्यात आला आहे.

बारसू धोपेश्वर परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या साडेचार हजार एकर जमिनींपैकी तीन हजार एकर जमिनींची संमत्तीपत्रे स्थानिक शेतजमीन मालकांनी शासनाला दिली आहेत. आमच्या प्रकल्पाला पूर्ण समर्थन आहे. मात्र, आमच्या जमिनीत होत असलेल्या सर्वेक्षणादरम्यान काही विरोधी मंडळी तेथे जाऊन अधिकार्‍यांना धमकावतात. असे प्रकार घडत असताना तेथे उपस्थित असणारे पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेतात, अशा तक्रारी पोलिस दलाबाबत करण्यात आल्या आहेत.

शासनाने तालुक्यातील धोपेश्वर परिसरातच रिफायनरी प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांनी त्या निवेदनात केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर रिफायनरी समर्थकांनी प्रकल्पाबाबतचे निवेदन त्यांना सादर केले. याच आशयाची निवेदने रिफायनरी समर्थकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पाठवून त्यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासन रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी दिलेल्या निवेदनाबाबत कोणता निर्णय घेते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button