रत्नागिरी : मंत्र्यांच्या दौर्‍यानंतरच परशुराम घाट होणार 24 तास खुला | पुढारी

रत्नागिरी : मंत्र्यांच्या दौर्‍यानंतरच परशुराम घाट होणार 24 तास खुला

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था खड्डेमय झाली आहे. आता राष्ट्रीय महामार्ग विभागाला महामार्गावरील खड्डे भरण्याची जाग आली आहे. मात्र, परशुराम घाट चोवीस तास सुरू होण्यास अजूनही काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौर्‍यानंतर परशुराम घाट चोवीस तास खुला होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. दरवर्षी पावसाळी अधिवेशनात आणि गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या स्थितीबाबत चर्चा होत असते. मंत्रालयात बैठका होत असतात. गेली कित्येक वर्षे ही प्रथा सुरू आहे. मात्र, महामार्गाच्या दर्जामध्ये सुधारणा झालेली नाही. दरवर्षी कोकणचा मुंबई-गोवा महामार्ग आणि त्याची अवस्था चर्चिली जाते आणि गणेशोत्सवापुरते तकलादू खड्डे भरून हा महामार्ग मोकळा केला जातो. याचप्रकारे याहीवर्षी परंपरेनुसार मुंबई-गोवा महामार्ग चर्चेत आला आहे. मंत्रालयात या बाबत बैठक सुद्धा घेण्यात आली आणि महामार्गावरील खड्डे भरण्यास प्रारंभ झाला आहे.

वर्षभरात मुंबई-गोवा महामार्गावर पंधराशेहून अधिक लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. चौपदरीकरणाचे काम रखडलेलेच असून, अपघातांमध्ये मात्र वाढ होत आहे, तर चौपदरीकरणाची डेडलाईन दरवर्षी वाढवली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला येणारा चाकरमानी तीव्र संताप व्यक्त करीत आहे. यावर्षी दरड कोसळल्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक आंबडस-चिरणी मार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळातील दरड कोसळण्याची घटना सोडल्यास पुन्हा दरड कोसळलेली नाही. या शिवाय दिवसा सकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेत घाटातील वाहतूक सुरळीत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी देखील परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला व्हावा, अशी आग्रही मागणी आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे.

गणेशोत्सव ऐन तोंडावर आला असताना देखील मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला केला जात नाही. आता तो मंत्र्यांच्या पाहणी दौर्‍यानंतरच खुला होणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर परशुराम घाट सुरू होईल की नाही या बाबत चाकरमान्यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे शासनाने या बाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक रात्रीच्यावेळी बंद करण्यात येते. यामुळे अनेक वाहनचालकांचा खोळंबा होतो. गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांसाठी मुंबई-गोवा महामार्ग चोवीस तास खुला व्हावा यासाठी शासनाने परशुराम घाट चोवीस तास खुला करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button