रत्नागिरी : स्वातंत्र्यसैनिकांचे ऋणी असले पाहिजे : नारायण राणे | पुढारी

रत्नागिरी : स्वातंत्र्यसैनिकांचे ऋणी असले पाहिजे : नारायण राणे

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने स्वातंत्र्य संग्रामातील महान व्यक्तिमत्त्वाचे स्मरण व्हावे आणि ‘हर घर तिरंगा’ हे अभियान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले, त्यांच्या कार्यासमोर, त्यागासमोर आपण नतमस्तक झालो, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. स्वातंत्र्य सैनिकांचे प्रत्येकाने ऋणी असले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी रत्नागिरीत आलेल्या केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी प्रथम विशेष कारागृहातील स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनी ज्या कोठडीत तुरुंगवास भोगला त्या कोठडीला भेट दिली. तेथील स्वा. सावरकर यांच्या तैलचित्राला अभिवादन केले आणि त्यांनी तेथील बंदीवानांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह अधीक्षक श्री. चांदणे यांनी ना. राणे यांचे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर ना. नारायण राणे यांनी शहरातील लो. बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. टिळकांच्या निवासस्थानाला भेट देऊन तेथे जतन केलेल्या आठवणींची माहिती घेतली. यावेळी तेथे स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाला तर राज्यातील सर्वात जुन्या नगर वाचनालयालाही ना. राणे यांनी भेट देऊन तेथील ग्रंथांची आणि वाचनालयाची माहिती घेतली.

या वेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी -सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुरानी जाखड, पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर, तहसीलदार शशिकांत जाधव, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, रेल्वे पोलीस श्री मदाळे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, शहराध्यक्ष सचिन पटवर्धन, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, लांजा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, राजू भाटलेकर, राजू कीर आदी उपस्थित होते.

Back to top button